Beed Santosh Deshmukh: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सुनावणीला २० मार्च रोजी सुरुवात झाली असून आज या प्रकरणातील दुसरी सुनावणी कोर्टात पार पडली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हत्या प्रकरणात सुरुवातपासून नेमकं काय घडलं आणि कोणत्या आरोपीचा काय रोल आहे, याची माहिती कोर्टासमोर मांडली. पवनचक्की कंपनीला मागण्यात आलेली खंडणी आणि नंतर झालेली सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन घटनांचा कसा संबंध आहे, हेदेखील निकम यांनी माहिती देताना सांगितलं आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मीक कराडसह सर्व आरोपींना व्हीसीद्वारे कोर्टात हजर करण्यात आलं होतं.
कोर्टासमोर युक्तीवाद करताना उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, "२९ नोव्हेंबर रोजी खंडणीबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. खंडणीसाठी विष्णू चाटेच्या कार्यालयात जी बैठक झाली त्या बैठकीला सर्व आरोपी हजर होते. वाल्मीक कराड याने जगमित्र या त्याच्या कार्यालयात पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितली. त्यानंतर जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांनी खंडणीला विरोध केला तेव्हा सुदर्शन घुले याने पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली. या मारहाणीनंतर तिरंगा हॉटेल इथं झालेल्या बैठकीत 'संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा' असं विष्णू चाटे याने सुदर्शन घुलेला सांगितलं. या संपूर्ण प्रकरणात वाल्मीक कराडने आरोपींना गाइड केलं," असा दावा निकम यांनी कोर्टात केला आहे.
नगरमध्ये आदिवासी कुटुंबावर हल्ला: घरे जाळून टाकली; महिलांनाही मारहाण, ६ जखमी
दरम्यान, आता हे प्रकरण आरोप निश्चितीसाठी तयार असल्याचं उज्ज्वल निकम म्हणाले. मात्र कागदपत्रे न मिळाल्याने आरोप निश्चित करण्यात येऊ नये, अशी विनंती आरोपींच्या वकिलांनी केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार आहे.