बीड : केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आता हक्काचे घर मिळाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मंगळवारी घराच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या दि. ९ डिसेंबर २०२४ रोजी झाली. हे प्रकरण राज्यभर गाजले. यामध्येच देशमुख यांना राहण्यासाठी व्यवस्थित घर नसल्याचेही समोर आले होते. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. संतोष यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी संवाद साधला. त्याप्रमाणे मस्साजोगमध्ये प्राथमिक शाळेच्या बाजूला असलेल्या ३० बाय ४० जागेत दोन मजली घर बांधून देण्याचा निर्णय घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेत पक्षाच्या वतीने हे बांधकाम करून देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे मंगळवारी श्री क्षेत्र नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. भगवान महाराज, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, स्वप्नील गलधर, धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कसे असणार घर?हे घर दोन मजली असेल. खाली एक बेड रूम, हॉल आणि किचन असेल. सोबतच दोन वाहनांसाठी पार्किंग असेल. वरच्या मजल्यावर दोन हॉल आणि दोन किचन असतील. बाथरूम, बेसिनही सर्वत्र असेल. बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यातील साहित्यही देण्यात येणार आहे. यासाठी येणारा सर्व खर्च उपमुख्यमंत्री शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या वतीने पूर्ण केला जाणार आहे.