परळीत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमाचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. परंतु या कार्यक्रमावरून आता विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. दीपावलीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात सपना चौधरी यांच्या नाचगाण्याच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान, या कार्यक्रमावरून सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी निशाणा साधला.
"परळीत धनंजय मुंडे यांनी सपना चौधरींचा नाचगाण्याचा कार्यक्रम आयोजित केला. अहमदनगरमधील सरकारी रुग्णालयात शनिवारी ११ रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. याचं मोठं सावट असताना, याशिवाय शेतकऱ्यांना आजही पैसे मिळाले नाही, त्यांची काळी दिवाळी साजरी होत असताना सामाजिक न्यायाच्या नात्यानं सपना चौधरींना ठुमके लावायला लावतात. एसटी कामगार आपल्या हक्कांसाठी धरणे आंदोलन करतोय, या प्रश्नावर लक्ष घालायचं सोडून ते सपना चौधरींना ठुमके लावायला लावत आहेत," असं म्हणत मेटे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला.
"सामाजिक खात्याचं सामाजिक भान त्यांनी राखणं आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात खुप प्रश्न उभे आहेत. याचा आढावा पालकमंत्र्यांनी घेतला आणि बीड जिल्ह्याला कायदा सुव्यस्था आणि अन्य गोष्टींमध्ये लक्ष घातलं, तर त्या खात्याला न्याय देण्याचं काम होईल. धनंजय मुंडे विरोधीपक्ष नेते असताना जेवढं सामाजिक भान ठेवून काम करत होते तेवढं सामाजिक भान त्यांचं कुठे हरपलंय असा प्रश्न प़डल्याशिवाय राहत नाही," असंही ते म्हणाले. या संपूर्ण प्रकरणावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली. अशा गोष्टी टाळता आल्या असत्या तर बरं झालं असतं अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.