नितीन कांबळे
कडा : पारंपरिक काळात शेती करताना बैलांचा मोठा वापर होत असे. गावा-गावातील शेतकऱ्यांच्या दारात बैलांची जोडी असायची; पण काही वर्षांपासून बैल सांभाळण्यापेक्षा दुभत्या गाईंच्या पालनाकडे कल वाढला आहे.
शेतीच्या मशागतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने शेतकऱ्यांच्या दावणीपुढील बैलांची संख्या घटली. बैलांऐवजी घरासमोर आता ट्रॅक्टर दिसू लागले. काळाच्या ओघात सर्जा-राजा हरवला अन् ट्रॅक्टर आला, असे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यात लाखांच्या घरात असलेल्या बैलांची संख्या आता फक्त १७ हजारांवर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची सर्जा-राजाची बैलजोड आता दावणीतून नामशेष होऊ लागल्याचे पशुधन विकास कार्यालयाचे आकडे सांगतात.
पूर्वी पोळा सणाच्या दिवशी शेतकरी बैलांचे पूजन करून थाटामाटात मिरवणूक काढायचा. तेव्हा गावाच्या मंदिरासमोर जागा अपुरी पडायची. बैलांशिवाय शेती नसायची; पण आता आधुनिक तंत्रज्ञान अवगत झाल्याने आणि बैलजोड्या संभाळताना पोषणाचा खर्च विनाकारण वाटू लागल्याने ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागली आहे. दुसरीकडे बैलजोडीऐवजी दुभत्या गाई घेऊन त्या सांभाळण्याकडे कल वाढला. त्या पैशातून ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती होऊ लागल्याने बैलजोडी भविष्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पोळ्याला बोटावर मोजता येतील एवढ्याच बैलजोड्या आहेत.
कृषी विभागाकडून ट्रॅक्टर
आधुनिक काळात शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरला महत्त्व येऊ लागले. मोठ्या प्रमाणावर शेतकरी ट्रॅक्टर खरेदी करू लागले. त्याचबरोबर कृषी विभागाकडून महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करून शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर मिळू लागल्याने बैलजोडीसाठी शेतकरी धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
आकडे सांगतात... बैलांची संख्या घटली
तालुका पशुधन विकास कार्यालयात २०१९ च्या पशुगणनेनुसार शेतीकामासाठी फक्त १७ हजार ५८९ बैलांची नोंद आहे. गावरान, विदेशी, रेडकू अशा लहान-मोठ्यांची एकूण २५ हजार ५५९ एवढी नोंद असल्याची माहिती तालुका पशुधन विकास अधिकारी डाॅ. मंगेश ढेरे यांनी ‘लोकमत’ला दिली.
खर्च वाढल्याने सांभाळायचा प्रश्न
बैलांना मोठ्या प्रमाणावर चारा लागतो. कमी क्षेत्रफळाची शेती असल्याने बैलजोडी सांभाळणे शक्य नाही. त्याऐवजी ट्रॅक्टरची शेती परवडत असल्याचे लिंबोडी येथील शेतकरी गहिनीनाथ आंधळे म्हणाले. तसेच दहा वर्षांपूर्वी आमच्या गावात घरोघरी बैलजोडी असायची. त्यानेच शेती व्हायची. पोळ्याला बैलजोडी दारात असल्याचा आनंद आणि अभिमान वाटायचा. आता गावात दहा ते पंधराच बैल आहेत, असे लिंबोडी येथील सोपान आंधळे यांनी सांगितले.