पुरुषोत्तम करवा
माजलगाव : पाऊस पडताच सरकीचा तुटवडा होत असल्याने सरकी पेंडीच्या भावात मागील चार महिन्यांत क्विंटलमागे दीड हजार रुपयांची वाढ झाली आहे. पशुखाद्याचे भाव वाढल्याने दुभत्या जनावरांना खायला काय द्यावे, असा प्रश्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे.
दुभत्या जनावरांना सरकीपेंड खायला दिली की, दूध उत्पादनात मोठा फायदा होतो. त्यामुळे दूध उत्पादक इतर चाऱ्यासोबत सरकीपेंड जनावरांना देताना दिसतात. यावर्षी चांगला पाऊस पडल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली होती; परंतु उन्हाळा सुरू होताच चाऱ्याचा प्रश्न निर्माण होते. यावेळी थंडीचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने जानेवारीतच उन्हाचे चटके बसायला सुरुवात झाली होती. तेव्हापासून पेंडीचे भाव वाढायला सुरुवात झाली.
उन्हाच्या तीव्रतेबरोबरच चाऱ्याचा प्रश्न भेडसायला सुरुवात झाली आहे. दूध उत्पादक उन्हाळ्यात जास्त प्रमाणात जनावरांना सरकीपेंड खाऊ घालतात.
यावर्षी उन्हाळ्यात चाऱ्याचा प्रश्न भेडसावत असल्याने दूध उत्पादकांचा सरकीपेंड घेण्याकडे कल वाढला होता. आता सरकीपेंडचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने यामुळे दूध उत्पादकांना भाव वाढवल्याशिवाय पर्याय राहणार नाही. परिणामी, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
पेंडीचे असे वाढले भाव (क्विंटल)
फेब्रुवारी - २,२०० रुपये
मेअखेर - ३,००० रुपये
१ जून - ३,४०० रुपये
८ जून- ३,८०० रुपये
-------------
कापूस उत्पादनात निम्म्याने घट
माजलगाव बाजार समितीअंतर्गत घेण्यात आलेल्या कापसाची यावर्षी आतापर्यंतची किंमत ८९ कोटी १० लाख रुपये असून, गेल्यावर्षी खरेदी केलेल्या कापसाची किंमत १९५ कोटी १७ लाख रुपये होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ५० टक्क्यांपेक्षा कमी कापूस उत्पादन झाले आहे.
------
सरकीपेंड कशासाठी?
सरकी पेंड खाऊ घातल्यास दुधाचा दर्जा चांगला राहून खवा चांगला तयार होतो, तर मलाई चांगल्या प्रकारे निघण्यास मदत होते. तसेच तूपही चांगले निघते. त्याचबरोबर जनावरांनी पेंड खाल्यानंतर ते पाणी जास्त पितात. त्यामुळे जनावरांची पाचन क्षमता वाढते व दुधात स्निग्धता वाढण्यास मदत होते.
-महादेव बांगर, दूधउत्पादक, डेपेगाव
------
कापूस महाग झाल्याने सरकीचे भाव वाढले
यावर्षी कापसाचे उत्पादन अत्यंत कमी असल्याने व सध्या कापसाचे भाव वाढल्यामुळे सरकीपेंडीचे भाव वाढले आहेत. त्यामुळे भाव कमी होतील की नाही, हे सांगणे अवघड आहे.
-रामेश्वर टवाणी, पेंडीचे उत्पादक