अंबाजोगाई : अंबाजोगाई लगतच्या मोरेवाडी येथील महिला सरपंच मागील दोन वर्षापासून गैरहजर असल्याचा आरोप करत काही ग्रामस्थांनी सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवून निषेध व्यक्त केला. सरपंचाला ग्राम पंचायतमध्ये उपस्थित राहण्यास सांगण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
यासंदर्भात मोरेवाडी ग्रामस्थांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. निवेदनात नमूद आहे की, येथील सरपंच मागील काही वर्षापासून फक्त झेंडावंदन व सार्वजनिक उत्सवासाठीच ग्राम पंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामकाज त्या घरात बसूनच करत आहेत. ग्रामस्थांनी अनेकदा विनंती करूनही त्या कार्यालयात येत नाहीत. तसेच, सरपंचांनी मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना ग्राम पंच्यात कार्यालयात हजर राहण्यास कायदेशीर सांगण्यात यावे अन्यथा वेगवेगळ्या आंदोलनाचा आणि ग्राम पंचायतचे कामकाज बंद पाडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सरपंचाच्या गैरहजर राहणायचा निषेध करण्यासाठी मंगळवारी (दि.१२) ग्रामस्थांनी ग्राम पंचायत कार्यालयात सरपंचाच्या खुर्चीवर चक्क कुत्र्याला बसवले. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
ग्रामसेवकाची बदली रद्द करण्याची मागणीयेथील ग्रामसेवक विनोद देशमुख यांची सोमवारी तडकाफडकी बदली करण्यात आली. देशमुख यांची बदली रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनावर प्रशांत बालासाहेब मोरे, किरण दीपकराव मोरे, बालाजी भाऊसाहेब मोरे, प्रवीण ज्ञानोबा मोरे, अनंत विश्वंभर मोरे, वैभव लक्ष्मण कचरे आदी ग्रामस्थांच्या सह्या आहेत.