माजलगाव : तालुक्यातील ढोरगाव येथील सरपंच यमुना ग्यानबा सरवदे यांना ग्रामपंचायत सदस्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी अपात्र ठरवले आहे. गावात राबविण्यात आलेल्या विविध शासकीय योजनेत काम न करता गैरव्यवहार करून अपहार आणि नियमित मासीक सभा 2018-19 मध्ये घेतल्या नसल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्यांनी केली होती.
तालुक्यातील ढोरगाव येथे गावच्या ग्रामपंचायत सहा सदस्यांनी 18 जानेवारी 2019 रोजी गावातील सरपंच यमुना गेनबा सरवदे व ग्रामसेवक यांनी मिळून विविध कामात गैरवापर केल्याची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे दाखल केली होती. यामध्ये गट विकास अधिकारी यांनी चौकशी केली असता त्यामध्ये गावातील समाज मंदिरासमोरील पेवर ब्लॉक काम पूर्ण न करता 33 हजार रुपये उचलले, जिल्हा परिषद शाळेजवळील नालिकाम अर्धवट ठेवून 43 हजार पाचशे रुपये उचलले, शाळेतील टीव्ही संचबद्दल बावीस हजार सहाशे रुपये उचलले, पाणी फिल्टर नादुरूस्त प्रकरणी 19 हजार व 23 हजार रुपये उचलले परंतु ही कामे केली नाही, तसेच दलित वस्ती सुधार योजनेत निकृष्ट सौर पथदिवे बसवले यासह विविध तक्रारीची चौकशी केली असता त्यात सत्यता आढळून आली व त्याप्रमाणे आपला अहवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 31 जुलै 2020 रोजी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39-1 नुसार कार्यवाहीस सरपंच पात्र असल्याचा अहवाल आयुक्तांना सादर केला.
याबाबत ग्रामसेवक यांना निलंबित करण्यात आले तसेच त्यांची एक वर्षाची वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आली. यानंतर विभागीय आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात आली. यात सरपंच यांचा समाधानकारक खुलासा नसल्याने व ते सतत गैरहजर असल्याने अखेर विभागीय विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39- 1 नुसार सरपंच यमुना गेनबा सरवदे या पुढील काळासाठी अपात्र असल्याचा निकाल दिनांक 26 मार्च रोजी दिला आहे.या निकालामुळे खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्य सुखदेव अर्जुन मुळे, यशवंत मारुती सातपुते, छगन दौलत सरवदे,दत्ता प्रकाश आबूज,शोभा भारत सातपुते, सुनीता छगन सरवदे या सदस्यांनी ही तक्रार दाखल केली होती.