पाटोदा (बीड ) : तालुक्यातील बेनसूर ग्रामपंचायतीच्या थेट जनतेमधून निवडल्या गेलेल्या सरपंच शारदा राजेंद्र सगरे यांचे सरपंचपद जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवले आहे. सगरे कुटुंबीयांनी ग्रामपंचायतच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे .
ऑक्टोबर 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शारदा राजेंद्र सगरे या बेनसूर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी थेट जनतेमधून निवडून आल्या होत्या. तर सुशीला परशुराम आर्सूळ यांची उपसरपंच म्हणून निवड झाली होती. दोन्ही पदाधिकारी आ. भीमराव धोंडे यांच्या गटातील होत्या. कालांतराने त्यांच्यात बेबनाव निर्माण झाला आणि उपसरपंच अर्सूळ आ. सुरेश धस यांच्या गोटात गेल्या. यानंतर आर्सूळ यांनी बीड जिल्हाधिकाऱ्यांकडे सरपंच शारदा सगरे यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले असल्याची तक्रार करून त्यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी केली होती.
शारदा सगरे यांचे पती राजेंद्र सगरे हे शासकीय सेवेत आहेत. बेनसूर ग्रामपंचायत हद्दीत त्यांच्या नावे 774 चौ.फुट जागा असल्याची नोंद ग्रामपंचायत रेकॉर्डला आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांनी ग्रामपंचायतीच्या जागेत अतिक्रमण केलेले आहे. सरपंच शारदा राजेंद्र सगरे यांचे सरपंचपद रद्द करावे अशी मागणी उपसरपंच सुशिला आर्सूळ यांनी दि.1/8/2018 रोजी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे केली होती. आर्सूळ यांच्या तक्रारीनंतर ग्रामसेवक व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी गावातील पंचांच्या उपस्थितीत या अतिक्रमीत जागेची मोजणी करुन अहवाल सादर केला. या अहवालावरून अतिक्रमण केल्याचे समोर आले.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच शारदा सगरे यांना पुरावे देण्याबाबत व म्हणणे मांडण्यासाठी संधी दिली . मात्र त्यांना पुरावे देता आले नाहीत त्यामुळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडे यांनी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (ज-3) व 16 प्रमाणे उत्तरवादीनां ग्रामपंचायत सरपंच व सदस्य राहण्यास अपात्र ठरवुन त्यांची निवड रद्द केली . बुधवारी 14 ऑगस्ट रोजी हा निर्णय दिला . उपसरपंच सुशीला आर्सूळ यांच्या वतीने अँड मुकुंद कुलकर्णी यांनी बाजू मांडली.