Satish Bhosale House Demolished: भाजपचा कार्यकर्ता खोक्या उर्फ सतीश भोसले यांच्या घरावर आज वनविभागाने बुलडोजर चालवला. शिरूर कासार शहरापासून काही अंतरावर वनविभागाची जमीन आहे. याच जमिनीवर वैदू वस्ती वसलेली होती. तिथे सतीश भोसलेने घर बांधलेलं होतं. ग्लास हाऊस असे या घराचं नाव होतं, हे घर अनधिकृत असल्याने वनविभागाने गुरूवारी बुलडोजरने जमीनदोस्त केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसले चर्चेत आला होता. त्याचे पैसे उधळतानाचे आणि ढाकणे पिता-पुत्राला मारहाण केल्याचे प्रकरणही समोर आले. त्याच्यावर वन्य प्राण्यांच्या शिकारी केल्याचाही गुन्हा दाखल केला गेला.
घरात शिकारीचे साहित्य सापडले
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सतीश भोसलेच्या घराची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले होते. त्यानंतर हे घर अनधिकृत असल्याचे समोर आले. वनविभागाच्या गट क्रमांक ५१ मध्ये अतिक्रमण करून हे घर बांधण्यात आले होते.
घरातील साहित्य काढले बाहेर, बुलडोजरने पाडले घर गुरूवारी (१३ मार्च) वनविभागाने दुपारी घर पाडण्यास सुरूवात केली. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घरातील साहित्य बाहेर काढले. त्यानंतर ग्लास हाऊस नाव असलेले सतीश भोसलेचे घर बुलडोजरने पाडण्यात आले.
या घरात समोरच्या बाजूला भाजपचे कार्यालय होते. तर मागच्या बाजूला घर. या वस्तीवरील इतर लोकांनी वनविभागाची नोटीस मिळाल्यावर घरे रिकामी केली होती. पण, सतीश भोसलेचे कुटुंबीय तिथेच राहत होते.
२० दिवसांत तीन गुन्हे
एका व्यक्तीला बॅटने मारहाण करतानाच सतीश भोसलेचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर त्याने ढाकणे पिता-पुत्रालाही बेदम मारहाण केली असल्याचे समोर आले. त्यानंतर सतीश भोसले फरार झाला होता. त्याच्यावर गेल्या २० दिवसात वेगवेगळ्या प्रकरणात ३ गुन्हे दाखल झाले आहेत.
वनविभागाने दिली ७ दिवसांची मुदत
वनविभागाच्या गट क्रमांक ५१ मध्ये सतीश भोसलेने अतिक्रमण करून घर बांधले होते. या प्रकरणी वनविभागाने पोलिसांत गुन्हा दाखल केला. या जागेवर मालकी हक्क दावा दाखल करण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला होता. पण, त्याच्याकडून कोणताही दावा न करण्यात आल्याने बुलडोजरने हे घर पाडण्यात आले.