परळी : परळीसह बीड जिल्ह्यातील 63000 शेतकऱ्यांचा सन 2018 चा खरीप व रब्बीचा मंजुर झालेला पीकविमा अद्याप पर्यंत मिळालेला नाही. या विम्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.मात्र कंपनीने दिलेला शब्द पाळला नसून विमा अद्याप जमा केला नाही. यामुळे किसान सभेचे नेते अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुणे येथे दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वाकडेवाडी येथील कार्यालयासमोर 'मुक्काम सत्यागृह आंदोलन' सुरु करून ठाण मांडले आहे.
आज सकाळी 10 वाजता शेतकरी या कार्यालयासमोर जमा झाले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं. सायंकाळी 5 पर्यंत हे आंदोलन सुरूच होते, जोपर्यंत आमच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा आंदोलक शेतकऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये परळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. तसेच अंबाजोगाई, माजलगाव, धारूर, वडवणी येथील शेतकऱ्यांचा सुद्धा उत्स्फूर्त सहभाग आहे. यावेळी किसान सभेचे नेते अजित अभ्यंकर ,अजय बुरांडे, दत्ता डाके, डॉ. ज्ञानेश्वर मोठे , सुदाम शिंदे, बालाजी कडबाने, मुरलीधर नागरगोजे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
विमा कंपनीने शब्द पाळला नाही जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. यापूर्वी गेल्या महिन्यात परळी तालुक्यातील तीनशे शेतकऱ्यांनी येथेच सहा दिवस आंदोलन केले. तेव्हा 15 डिसेंबर पर्यंत विमा रक्कम जमा करण्याचे आश्वासन विमा कंपनीने दिले होते. ते पाळण्यात आले नाही यामुळे आज १२०० शेतकऱ्यांसह हे आंदोलन सुरु आहे. निर्णय होत नाही तोपर्यंत या संख्येत वाढ होत राहील. - अजय बुरांडे, किसानसभा