बीड : महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेकडून सध्या अस्थी व सांधे आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यभर कार्यक्रम घेतले जात आहेत. यात प्रशिक्षण व जनजागृतीचा समावेश आहे. राज्यातील जवळपास १ लाख लोकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असून यासाठी १ ते ७ ऑगस्टदरम्यान सप्ताह राबविला जात आहे. अपघातग्रस्तांना प्रथमोपचाराने वाचवता येते. त्यामुळे यावर्षी ‘स्वत:ला आणि इतरांनाही वाचवा’, (सेव्ह सेल्फ, सेल्फ वन) या घोषवाक्याला डोळ्यासमोर ठेवून काम केले जात आहे.
रस्त्यावर अपघात झाल्यानंतर तातडीची वैद्यकीय मदत अपघातानंतर पहिल्या तासात (गोल्डन अवर) न मिळाल्यामुळेच मृत्यू अधिक होत असल्याचे समोर आलेले आहे. हे मृत्यू प्रथमोपचाराने टाळता येऊ शकतात. यासाठी विद्यार्थी, युवक, तरुणी, वाहतूक पोलीस यांना कोरोनामुळे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. १ ऑगस्ट रोजी याला सुरुवात झाली आहे. तसेच हाडे व स्नायू बळकटीसाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे. यात सहभागी होण्याचे आवाहन बीड अस्थिरोग संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद शिंदे, सचिव डॉ. एस. एल. आळणे यांनी केले आहे.
--
ही आकडेवारी विचार करायला लावणारी...
देशात व राज्यात रस्त्यांवरील अपघातात जाणाऱ्या बळींची संख्या गंभीर आहे. २०१८ च्या जागतिक आकडेवारीनुसार १९९ देशांपैकी रस्ते अपघातांमधील बळींच्या आकडेवारीनुसार भारत देश प्रथम क्रमांकावर आहे. आपल्यानंतर चीन आणि अमेरिका यांची आकडेवारी आहे. २०१९ च्या आकडेवारीनुसार भारतातील संपूर्ण राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात एकूण ४ लाख ४९ हजार ००२ एवढ्या अपघातांची नोंद आहे. यापैकी १ लाख ५१ हजार ११३ लोकांना आपला जीव गमवावा लागला. ४ लाख ५१ हजार ३६१ लोकांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या. १८ ते ४५ वर्षे वयोगटाच्या तरुणांचे अपघातग्रस्त होण्याचे प्रमाण ६९.३ टक्के आहे. १८ ते ६० या काम करणाऱ्या ग्रुपमधील लोकांचे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण ८४.३ टक्के इतके जास्त आहे. ही सर्व आकडेवारी विचार करायला लावणारी असून हे अपघात टाळण्यासाठी संघटना काम करत आहे.
----
हाडे आणि सांधे मजबूत ठेवण्यासाठी उपाय...
आपल्या मुलांच्या आहारात नेहमी दूध वापरा, मुलांना मोकळ्या मैदानात खेळूद्या, मुलींच्या आहारात दुधाचा वापर प्राधान्याने करा, असे आवाहन डॉ. प्रमोद शिंदे यांनी केले आहे.
---
अस्थी व सांधे आरोग्य दिनाच्या निमित्ताने १ ते ७ ऑगस्टदरम्यान जनजागृती, प्रशिक्षण ठेवले आहे. याला सुरुवात झाली असून राज्यभरात १ लाख लोकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. तसेच मार्गदर्शनही केले जाणार आहे. बीडमध्ये जनजागृतीची हाेर्डिंग्ज लावले आहेत.
- डॉ. प्रमोद शिंदे, अध्यक्ष, अस्थिरोग संघटना, बीड.
010821\01_2_bed_8_01082021_14.jpg
डॉ.प्रमोद शिंदे, अध्यक्ष