कृषी विभाग, सहायक कृषी अधिकारी परिवार, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना व राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम बीजप्रक्रिया ऑनलाइन स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत नोंदणी केलेल्या बीड जिल्ह्यातील १०८ स्पर्धक शेतकऱ्यांना आरसीएफने बायोला बीजप्रक्रिया संवर्धकाचे मोफत वाटप केले. सोशल मीडियाचा वापर करून १४ मे ते १५ जुलैदरम्यान ही स्पर्धा राबविण्यात आली होती. स्पर्धेत बीड जिल्ह्यातून २३४ शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. यापैकी ७७ शेतकऱ्यांनी आपले बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करतानाचे व्हिडिओ बनवून सक्रिय सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग घेऊन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना तंत्र शुद्ध पद्धतीने बीजप्रक्रिया तंत्रज्ञान सांगावे, बीजप्रक्रिया एक लोकचळवळ व्हावी, रासायनिक खतांचा वापर कमी व्हावा, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली. पुरस्कारासाठी राज्यस्तरावर प्रथम पाच स्पर्धकांची निवड करण्यात आली, तर सहभागी बालकांमधून पाच मुलांची निवड करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील प्रथम तीन स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. स्पर्धा यशस्वी होण्याकरिता कृषी विभागाचे कृषी विस्तार संचालक विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय मुळे, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनांचे अध्यक्ष बापूसाहेब शेंडगे यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले.
या स्पर्धेत बीड जिल्ह्यातून प्रथम सविता श्रीकृष्ण बोबडे, आसोला, ता. धारूर, द्वितीय कृष्णा मधुकर खांडेकर, कारी, ता. धारूर, तृतीय विष्णू माणिकराव चाटे, वरवटी, ता. अंबाजोगाई यांनी मान मिळविला.