कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने निर्बंध काहीसे शिथिल झाले. १० सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन झाले होते; मात्र गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे मंडपात जाऊन तसेच मुखदर्शन घेण्यासही परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संख्याही कमी होती. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक न काढता केवळ मंडळ पदाधिकाऱ्यांनी (दहा जणांच्या मर्यादेत)
गणेश विसर्जन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणूक न काढता साधेपणाने ''श्रीं''ना निरोप द्यावा लागणार असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झाला आहे.
दरम्यान, बीडमध्ये कंकालेश्वर मंदिराजवळील विहीर व खंडेश्वरी देवी मंदिराजवळील बारवात मूर्ती विसर्जन करण्यात येणार आहे. निर्माल्य टाकण्याची सुविधा येथे पालिकेने उपलब्ध केली आहे.
.....
शहरात दोन ठिकाणी विसर्जनस्थळ तयार केले आहेत. या परिसरातील स्वच्छता करण्यासह मार्गावरील खड्डेही बुजविणे सुरू आहेत. पालिकेकडून ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त केले असून निर्माल्य जमा करण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा आहे.
- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड