शिरूर कासार (जि. बीड): तालुक्यात आठ दिवसांत २१ कावळे व तीन चिमण्यांचा मृत्यू झाला. यापैकी पाडळी येथील मृत पक्ष्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने पशुवैद्यकीय विभागाचे सर्व डाॅक्टर व कर्मचाऱ्यांना अलर्ट करण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी दिली.
कुक्कुटपालकांनी घाबरून न जाता वेळोवेळी पशुवैद्यकीय दवाखाना व डाॅक्टरांशी संपर्कात रहावे, तसेच काळजीसुद्धा घेणे जरूरी आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने मृत पक्ष्यांची विल्हेवाट लावताना शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करणे जरूरीचे आहे. त्यासाठी गावपातळीवर ग्रामपंचायतीची मदत घेणे, कोंबड्यांचे रक्तजल नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले आहे. अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांमध्ये या रोगाचा संसर्ग झाला किंवा नाही, हे स्पष्ट होईल, सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना याबाबत सतर्क राहण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. बर्ड फ्लू हा संसर्गजन्य असल्याने सर्वांनीच काळजी घेणे जरूरीचे आहे. पक्ष्यांमध्ये असाधारण मरतुक आढळून आल्यास त्याला न हाताळता त्याची अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे, असे आवाहन डॉ. आघाव यांनी केले.
तालुक्यात कावळ्याबरोबर चिमण्यांचा मृत्यू झाला; मात्र आतापर्यंत कोंबडी मृत नसल्याचे सांगण्यात आले. १२ ते २० जानेवारीदरम्यान आठ दिवसांत पाडळी येथे २, जाटनांदूर १, पिंपळनेर १, राक्षसभुवन ५, तिंतरवणी १, शिरूर १, तर रायमोहा येथे ५ कावळे मृत पावले तर पिंपळनेर २ व घोगसपारगाव येथे १ चिमणी मृत पावल्याचे सांगण्यात आले. तालुक्यातून १०६ कुक्कुट पक्ष्यांचे नमुने बुधवारी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत.