बीड : जिल्ह्यात सध्या सकाळी अकरानंतर लॉकडाऊन आहे. विनाकारण फिरण्यास बंदी आहे. काही लोक चुकीचे ओळखपत्र आणि हौस म्हणून बाहेर फिरतात. त्यांची तपासणी बुधवारी सकाळी शिवाजीनगर पोलिसांनी केली. परंतु, हा केवळ तासाभराचा देखावा राहिला. 'सरप्राईज चेकिंग' असल्याचे सांगत वाहने अडविण्यात आली. यामुळे कोंडी होऊन लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही चेन ब्रेक करण्यासाठी सर्वत्र अकरानंतर लॉकडाऊन केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद ठेवण्याचे आदेश आहेत, तसे अत्यावश्यक कारणांशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. असे असले तरी काही लोक चुकीचे ओळखपत्र दाखवून आणि खोटी कारणे सांगून घराबाहेर पडत आहेत. याला आळा बसावा म्हणून शिवाजीनगर पोलिसांनी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगर रोडकडून येणाऱ्या वाहनांची अचानक तपासणी सुरू केली. बॅरिकेड्स लावून नाकाबंदी करण्यात आली. परंतु, केवळ तासाभरासाठीच ही नाकाबंदी झाली. त्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली. लोकांना आवर घालायचाच होता तर दिवसभर नाकाबंदी करून बंदोबस्त का नियुक्त केला नाही, असा सवालही उपस्थित होत आहे. केवळ वरिष्ठांचे आदेश पूर्ण करण्यासाठी आणि तपासणी केल्याचे कागदी घोडे नाचविण्यासाठीच ही नाकाबंदी होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचा फटका मात्र इतर सामान्यांना बसला आहे. तसेच वाहतुकीची कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दिवसभर रस्त्यांवर वाहनांची गर्दी
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आणि लॉकडाऊन करूनही काही लोक दिवसभर रस्त्यावर फिरत आहेत. वाहने व नागरिकांची वर्दळ कायम दिसते. पोलिसांकडून साधे हटकलेही जात नसल्याने नागरिक आणखीनच बाहेर पडत आहेत. जिवाला धोका आहे, हे माहिती असतानाही लोक घराबाहेर पडत असून, स्वत:सह कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहेत. नियमांचे पालन करावे, असे आवाहन होत आहे.
खोट्या ओळखपत्रांवर मुक्त संचार
काही लोक पत्रकार, आरोग्य कर्मचारी, मेडिकलचा कर्मचारी, आदी खोटे ओळखपत्र गळ्यात अडकवून विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्या लोकांना शोधून काढत कारवाई करण्याची गरज आहे. आणि हे शोधण्याचे आव्हानदेखील पोलिसांसमोर असणार आहे. बुधवारी सकाळीही ओळखपत्र दाखवून जाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.
...
विनाकारण फिरणाऱ्यांची तपासणी केली. सरप्राईज चेकिंग म्हणून नाकाबंदी केली होती. याबाबत मी जास्त बोलू शकणार नाही. वरिष्ठांना विचारावे.
नितीन पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे, बीड.
===Photopath===
210421\21_2_bed_18_21042021_14.jpeg
===Caption===
बीड शहरातील नगर रोडवर पोलिसांनी तासाभरापूरती नाकाबंदीचा देखावा केला. त्यावेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.