गेवराई : शहरातील सरस्वती काॅलनी भागात राहणाऱ्या एका आठ वर्षीय शाळकरी मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वेळेत लक्षात न आल्याने त्याचा रेबीजने मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी घडली. कुत्र्याने चावा घेतल्याचे लक्षात न आल्याने १५-२० दिवसांत रेबीजच्या प्रभावाने त्याची प्रकृती बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेने गेवराईतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पुनीत जितेंद्र मुंदडा असे कुत्रा चावल्याने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो दुसरीच्या वर्गात शिकत होता. घराजवळच्या रस्त्यावर सायकल चालवत असताना कुत्रा मागे लागल्याने पुनीत घाबरून खाली पडला. त्याचवेळी पिसाळलेल्या त्या कुत्र्याने त्याच्या कानाजवळ चावा घेतला. त्यावेळी लाॅकडाऊन असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. त्यामुळे ही बाब कुणाच्याही लक्षात आली नाही. कुत्र्याने चावा घेतल्याचे पुनीतलाही लक्षात आले नाही. घरीदेखील सायकलवरून पडल्याने मार लागल्याचे त्याने सांगितले. त्याअनुषंगाने त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र पाच-सहा दिवसांपासून पुनीत अचानक घाबरू लागला, थरथर कापू लागला. या तक्रारी वाढल्याने वडिलांनी त्याला खासगी दवाखान्यात नेले व उपचार घेतले. नंतर प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला अखेर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी रक्ताची तपासणी केल्यानंतर रेबीज झाल्याचे लक्षात आले. उपचाराला विलंब झाल्याने रेबीजची लक्षणे बळावली होती. त्यामुळे ४ मे रोजी रोजी पुनीतचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वाढला आहे. दिवसा व रात्रीच्या वेळी भटकी कुत्री लोकांवर हल्ले करतात. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
माझा पुतण्या पुनीत मुंदडा याचा मृत्यू पिसाळलेला कुत्रा चावल्यामुळे रेबीजने झाला असल्याचे उपचार करणाऱ्या डाॅक्टरांनी आम्हाला सांगितल्याचे मयत पुनीतचे चुलते योगेश मुदंडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.