लोखंडी सावरगाव : अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील शेतामध्ये कोंबड्यांचा मृत्यू एव्हीएन इन्फ्ल्यूएंझामुळे झाल्याचे आढळून आल्याने या अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये म्हणून प्रशासन दक्ष झाले आहे. प्रतिबंधक उपाययोजना म्हणून १२४५ बाधितांसह चांगल्या कोंबड्यांचे कलिंग करून शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व्ही. बी. देशमुख, उपायुक्त डॉक्टर रवी सूर्यवाड, तांदळे, विस्ताराधिकारी डॉ. मुंडे एस एस, डॉ. धनाजी देशमुख, बगाडे, डॉ. पी. आर. धनवे, संतोष जोशी, सरपंच राजपाल देशमुख, ग्रामविकास अधिकारी एस. बी. शिंदे, मंडळाधिकारी ए. एन. केंद्रे, तलाठी आर. जे. ननावरे, आरोग्य उपकेंद्राचे डॉ. मधुरा उन्हाळे, डॉ. भरत नांगरे, आरोग्य सेवक अशोक राऊत, बालाजी वाघमारे, एस. एन. कोलपुसे, एस. व्ही. मुंडे, संजय देशमुख, बापू बनसोडे तसेच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस कर्मचारी ए. एम. सजादे, डी. ए. गायकवाड , पी एस पागड, पी एस उळे, भैरव सोमवंशी आदी उपस्थित होते.
गेल्या काही काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वसाधारण जनतेला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. या आर्थिक संकटातून उभारी मिळावी म्हणून जोडधंदा करण्याच्या उद्देशाने शेतकरी, मजुरांनी गावरान कुक्कुटपालनाचा व्यवसाय चालू केला होता. मात्र, बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर अशांनाही चांगलाच आर्थिक फटका बसल्याचे दिसून येत आहे.
गावात, परिसरात कावळे, कोंबड्या मृत आढळल्यास घाबरून न जाता ग्रामपंचायत, नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा, मास्क वापरावे, स्पर्श करू नये, सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुन्याने निर्जंतुकीकरण करून घ्यावा.
-डॉ. व्ही. बी. देशमुख,
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, बीड