शिरूर कासार : कडक लाॅकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी भर उन्हात पोलीस रस्त्यावर खडा पहारा देत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. याशिवाय पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गावांतसुद्धा फेरफटका मारत असून, नागरिकांना कोरोनाची नियमावली पाळण्याचे आवाहन करीत आहेत. रविवारी पोलीस उपनिरीक्षक डॉ. रामचंद्र पवार हे जिजामाता चौकात आपला फौजफाटा घेऊन ये-जा करणाऱ्या लोकांबरोबर वाहनांचीदेखील विचारपूस करीत होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस उन्हाची पर्वा न करता खडा पहारा देत आहेत, याची जाणीव ठेवून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
फोटो
२) खतांच्या दरवाढीने शेतकरी धास्तावला
शिरूर कासार : आता शेणखताची वानवा असल्याने रासायनिक खतांच्या आधाराने शेत उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतो. शेतमेहनतीत जिवाची पर्वा न करता शेतकरी झिजत असतो. मात्र, आता डिझेल भाववाढीने यंत्रशेती व रासायनिक खतांच्या भाववाढीने तो हतबल होत आहे. खताच्या भाववाढीने तो आता चांगलाच धास्तावला आहे.
गो-शाळेतील गायींसाठी चारा दान
शिरूर कासार : सिद्धेश्वर संस्थानवर महंत स्वामी विवेकानंद शास्त्री हे निष्काम भावनेतून गोसंगोपन करीत आहेत. संस्थानला कुठलेच निश्चित उत्पन्नाचे साधन नसून कीर्तन, प्रवचन व भिक्षेवर संस्थान चालवीत आहे. सध्या लाॅकडाऊन आणि धार्मिक कार्यक्रम बंद असल्याने आर्थिक विवंचनेत भर पडत आहे. त्यांनी गायीसाठी चारा देण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत अशोक कृष्णात गाडेकर यांनी मोफत चारा दान केला. सर्वांकडे सध्या चारा उपलब्ध आहे म्हणून जमेल तेवढा गायीसाठी चारा देण्याचे आवाहन विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे.
वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे नुकसान
शिरूर कासार : तालुक्यात दोन दिवसांपासून वादळी वारे वाहत असल्याने आंब्याच्या कैऱ्या पडू लागल्याने आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसू लागल्याचे दिसून येत आहे. आंबा पाडाला लागल्यानंतर तो उतरून घेतला जातो; परंतु त्या आधीच वाऱ्यामुळे कैऱ्या खाली पडत असल्याने नुकसान होत आहे.