शिरीष शिंदे, बीड: लोकसभा निवडणुकीत उभे असलेल्या ३५ उमेदवारांच्या निवडणूक लेखांची तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक सुशांता कुमार बिस्वास यांनी शनिवारी केली. सदरील लेखा तपासणीसाठी ६ उमेदवार गैरहजर होते, त्यांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. उमेदवारांकडून योग्य स्पष्टीकरण न आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बिस्वास यांनी सांगितले.
४, ८ व १२ मे रोजी निवडणूक लेखांची तपासणी केली जाणार असल्याची पूर्वसूचना देण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील निवडणूक लेखांची तपासणी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र जिल्हाधिकारी कार्यालय येथे शनिवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ दरम्यान करण्यात आली. तपासणी झालेल्या उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार अधिक होते. उमेदवारांनी आतापर्यंत केलेल्या खर्चाच्या पावतीची नोंद निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या नोंदवहीत योग्य पद्धतीने घेतली आहे की नाही, याची तपासणी स्वतः खर्च निरीक्षक बिस्वास यांनी केली.
यावेळी उमेदवारांनी निवडणुकीच्या काळात निवडणूक खर्चासाठी उघडलेले बँक खाते, त्यात जमा झालेली आणि खर्च झालेली रक्कम याचा ताळमेळ बसतो आहे का त्याची पाहणी करून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्त्या सुचविल्या. ज्या उमेदवारांनी अथवा प्रतिनिधींनी शनिवारी निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर नोंदवही तपासून घेतली नाही, त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे. उमेदवारांकडून योग्य स्पष्टीकरण न आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे खर्च निरीक्षक यांनी सांगितले. पुढील तपासणी ८ मे आणि १२ मे रोजी राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. सदरील तपासणी ही खर्च निरीक्षक सुशांता कुमार बिस्वास हेच करणार आहेत.