अनिल महाजन ।धारूर (जि. बीड) : राजस्थानातील उदयपूर येथे राष्ट्रीय कला प्रदर्शनासाठी गेलेले महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील ११ नवोदीत शिल्पकार लॉकडाऊनमुळे अडकले असून सर्वांना घरी परतण्याची प्रतीक्षा लागली आहे.राजस्थान सरकारच्या कला संचालनालयाने उदयपूर येथे ३ ते २३ मार्चदरम्यान फायबर प्रोजेक्टचे आयोजन केले होते. यासाठी राज्यातील अकरा शिल्पकार तेथे गेले होते. प्रोजेक्ट संपल्यानंतर त्यांनी २४ मार्चच्या विमानाची तिकीटे आरक्षित केली होती; परंतु २३ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ते तेथेच अडकले. अडकलेल्या या शिल्पकारांमध्ये सुधीर उमाप (बीड), किरण भोईर (नाशिक ), वरूण भोईर (नाशिक), हर्ष पाटील (धुळे), अभिषेक साळवे (अहमदनगर), प्रदीप कुंभार (कोल्हापूर), बीरदेव एडके (कोल्हापूर), अभिषेक कुंभार (कोल्हापूर), संदीप वडगेंकर (कोल्हापूर), सुमेध सावंत (रत्नागिरी ), आकाश तिरीमल (मुंबई) यांचा समावेश आहे हे शिल्पप्रदर्शन संपून महिना उलटला आहे. महिनाभरापासून या सर्वांची व्यवस्था आयोजकांमार्फत केली जात आहे. या सर्वांना घराची ओढ लागली आहे.>उदयपूर येथे राष्ट्रीय पातळीवरील शिल्प प्रदर्शसाठी आम्ही आलो होतो. लॉकडाऊन मुळे एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून उदयपूरमध्येच अडकून पडलो आहे. राज्य शासनाने आम्हाला येथून घेऊन जाण्याची व्यवस्था करावी. - सुधीर उमाप, शिल्पकार, धारूर (जि. बीड)
महाराष्ट्रातील शिल्पकार राजस्थानात अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 4:28 AM