आष्टी : माजी पालकमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या चार वर्षात विकासाचे असे काम करू, की पुढील अनेक वर्षे त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील, असे प्रतिपादन बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
'ब' दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकासकामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ, असा शब्दही यावेळी धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
यावेळी गहिनीनाथ गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज शास्त्री, खा. प्रीतम मुंडे, आ. बाळासाहेब आजबे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, बजरंगबप्पा सोनवणे, साहेबराव दरेकर, भीमराव धोंडे, सतीश शिंदे, जयदत्त धस, शिवभूषण जाधव, आप्पासाहेब राख, अण्णासाहेब चौधरी, विठ्ठल सानप, विश्वास नागरगोजे, शिवाजीराव नाकाडे, सतीश बडे यांसह गडाचे वारकरी, टाळकरी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संत वामनभाऊ यांच्या जीवन चरित्रावर आधारित ओवी स्वरुपातील ग्रंथाचे यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या ग्रंथाचे लेखन संत एकनाथ महाराज यांचे १४वे वंशज ह. भ. प. प्रमोद दिगंबर महाराज यांनी केले असल्याची माहिती विठ्ठल महाराजांनी दिली.
संत वामनभाऊ यांचे आपण निस्सीम भक्त असून, राज्याचा मंत्री म्हणून नाही तर एक भक्त म्हणून या गडावर आलो आहे व भविष्यातही अखंडपणे येत राहीन, असे म्हणताना वामनभाऊ महाराजांचे आपल्याला आशीर्वाद असल्याचेही म्हटले.
गेल्या १७ वर्षांपासून आपण गडावर पुण्यतिथीनिमित्त आयोजित महापूजेस येत असून, महापूजेचा हा मान आपल्यासाठी कोणत्याही पदापेक्षा खूप मोठा आहे, अशा शब्दात मुंडेंनी आपल्या भक्तिभावना प्रकट केल्या.
धनंजय मुंडे, ह. भ. प. विठ्ठल महाराज यांच्या हस्ते महापूजा
तत्पूर्वी सकाळी ७.३० वाजल्यापासून संत वामनभाऊ यांच्या समाधी मंदिरात पुण्यतिथीनिमित्त पारंपरिक महापूजा धनंजय मुंडे व गहिनीनाथ गडाचे महंत ह. भ. प. विठ्ठल महाराज यांच्या हस्ते संपन्न झाली. त्यानंतर समाधीचा महाभिषेक व महाआरती करण्यात आली. यावेळी आ. बाळासाहेब आजबे, बजरंगबप्पा सोनवणे, सतीश शिंदे आदींची उपस्थिती होती.
विकासाठी शुभेच्छा : पंकजा मुंडे
ज्यांच्या हातात सत्ता मिळाली आहे ते आता नक्कीच चांगला विकास करतील, यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना उद्देशून म्हटले. विकास करण्यासाठी माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक वर्षे आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील, असा विकास करू, असे धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर देतांना यावेळी म्हटले.