- शिरीष शिंदे बीड : जिल्ह्यातील २१ वाळू घाट सुरु होणार असून त्या संदर्भातील प्रक्रिया सुरु आहे. विशेष म्हणजेच मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यातच वाळू टेंडर स्वीकृतीला सुरुवात होईल. त्या पाठोपाठ वाळू उपसा सुरु होणार आहे. मागच्या वेळी वाळू घाटांच्या टेंडर स्वीकृती प्रक्रियेला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर महिनाभर टेंडर प्रक्रिया चालली. जवळपास २२ वाळू घाटांना मागच्या वर्षी मंजुरी दिली गेली होती. त्यातील दोन ते तीन वाळू घाट काही कारणानिमित्त बंद होते. तसेच गंगावाडी येथील वाळू घाटही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर बंद झाला होता. दरम्यान, यावर्षी लवकरच वाळू घाटच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिली. टेंडर प्रक्रिया सुरु करण्याचे काम जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गौण खनिजचे अव्वल कारकून हर्षद कांबळे करीत आहेत. तालुका- वाळूघाट- लिलाव योग्य वाळूघाट माजलगाव-३२-३ गेवराई-५१-१४ परळी-९-३ गेवराईची वाळू क्वालिटीची बीड जिल्ह्यातील इतर वाळू घाटांच्या तुलनेत गेवराई तालुक्यातील वाळू घाटांवरील वाळू क्वालिटीची असल्यामुळे तेथील वाळूला अधिक मागणी असते. तसेच तेथील वाळूला दरही अधिक असतो. गेवराई तालुक्यात सर्वाधिक वाळूची तस्करी होण्याचे हेच मुख्य कारण आहे. त्यामुळेच त्या पट्ट्यात वाळूचे राजकारण अधिक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाळू चोरीची बहुतांश प्रकरणे अधिकाधिक गेवराईतीलच असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.
नुकतीच झाली बैठक जिल्हाधिकारी शर्मा, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, निवासी उपजिल्हाधिकारी राऊत व गौण खनिजचे अव्वल कारकून हर्षद कांबळे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू घाट संदर्भाने नुकतीच बैठक झाली. या बैठकीत २१ वाळू घाटावर शिक्कामोर्तब झाले. ही २१ वाळू घाट जेथे आहेत त्या ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन होकार दिला आहे.