अनिल महाजन धारुर (जि.बीड) : जीवनाचा अंतिम प्रवास सुरळीत झाला पाहिजे. मृत्यू झाल्यानंतर वैर संपते, अशी सर्वत्र भावना असते. मात्र धारुर तालुक्यातील ५४ गावांपैकी तब्बल ३४ गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी स्मनशानभूमीच अस्तित्वात नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत्यू झाल्यानंतर अनेक कुटूंबांना अंत्यसंस्कार कोठे करावेत हा प्रश्न निर्माण होतो. यातुन अनेकवेळा वादही उद्भवतात. शेवटी एखाद्या नदीकाठची जागा शोधावी लागते, अशी व्यथा नागरिकांनी व्यक्त केली.
धारुर तालुक्यातील बहुतांश भाग डोंगराळ आहे. या तालुक्यात एकुण ५४ ग्रामपंचायती आहेत. वाड्या, वस्त्या, तांडे आहेत. त्यापैकी केवळ २० ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचीही दुरावस्था झालेली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाहीत. ही परिस्थिती स्मशानभूमी असलेल्या गावातील आहे. तर ३४ ग्रामपंचायतींकडे स्मशानभूमी उभारण्यासाठीच जागा उपलब्ध नाही. या गावांमध्ये ज्यांच्याकडे स्वत:चे शेत आहे. ते शेतात अंत्यसंस्कार करतात. मात्र भूमिहीन असलेल्यांना अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शोधावी लागते. ज्यांच्याकडे जमिन आहे. त्यांना विनंती करावी लागते. वादळ, पाऊस, वारा आल्यास तात्पुरता निवारा उभत्तरावा लागतो. यात नातेवाईकांची दु:खाच्या वेळी त्रेधातिरपिट उडते. याविषयी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.एस. कांबळे यांच्याशी संपर्कस साधला असता, नुकताच पदभार घेतला आहे. त्यामुळे गावनिहाय स्मशानभूमीची माहिती घेऊन यावर भाष्य करता येईल, असे सांगितले.4000 लोकसंख्येच्या गावातही स्मशानभूमी नाहीचार हजार लोकसंख्येचे गाव असलेले अंजनडोहमध्ये स्मशानभूमी अस्तित्वात नाही. मृत्यू झाल्यानंतर अनेकवेळा जागेची शोधाशोध करावी लागते. ज्यांना स्वत:चे शेत नाही, त्यांना प्रचंड अडचणींचा सामना गावात करावा लागतो. त्यामुळे स्वतंत्र स्मशानभूमी उभाराव्यात, अशी मागणी गावातील युवक कार्यकर्ते योगेश साखरे यांनी केली.