बीड : जिल्ह्यात १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शोधमोहिमेत सर्व संबंधित घटकांनी सहभागी व्हावे आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामुदायिक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. विक्रम सारुक यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यासंदर्भात कृती कार्यक्रम तयार करून तो यशस्वीपणे राबविण्यात यावा. सर्व संबंधितांना लेखी सूचना देवून तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यावेळी दिले. शिक्षणाधिकारी डॉ. विक्रम सारुक यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, अधिव्याख्याता कापसे, यांच्यासह इतर समिती सदस्य उपस्थित होते.
--
सर्व घटकांचा सहभाग असावा
शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम यशस्वी करण्यासाठी बालरक्षक, सर्व शिक्षक, अंगणवाडीसेविका, मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचार्य आदी सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी जगताप म्हणाले.
मोहीम यशस्वी करू
प्रारंभी समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेचा उद्देश आणि कार्यवाहीबाबत सविस्तर विवेचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवून यशस्वी करण्याची ग्वाही दिली.
---------