माजलगाव (बीड) - ऐन दिवाळीच्या काळात विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. यातच कामावर रूजु व्हा, अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांनी आक्रमक पवित्रा घेत आज सकाळी 11 वा. माजलगाव आगारात परिवहन मंत्री रावते यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. यावेळी अनेक कर्माच्या-यांनी मुंडन केले.
सातवा वेतन आयोग लागू करण्यासोबतच इतर मागण्यासाठी एसटीच्या कर्मचार्यांनी ऐन दिवाळीच्या काळात संपाचे हत्यार उपसले आहे. गाड्या रस्त्यावर आणायच्याच नाहीत, अशी भूमिका घेऊन सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कर्मचा-यांकडून सुरू आहे. मात्र, सरकारने कर्मचार्यांच्या संपाला दाद न दिली नाही. उलट कामावर रूजु व्हा अन्यथा निलंबनाच्या कारवाईला सामोरे जा, असा इशारा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिला. त्यामुळे एसटी कामगार अधिकच आक्रमक होवून आमच्या न्याय मागण्या न सोडवता, शासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप कर्मचा-यांनी केला.
या वक्तव्याच्या निषेध करत माजलगाव आगारातील कर्मचार्यांनी दिवाकर रावते यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यात गाढवे सामील करून काही कर्मचा-यांनी मुंडन केले व परिवहन मंत्र्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आमच्या न्याय मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप चालूच ठेवण्याचा पवित्रा कायम ठेवला.
खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लुटएसटी बंद असल्याने प्रवाशांना खाजगी वाहतुकीकडे वळणे भाग पडत आहे. मात्र, या वाहतुकदारांकडून प्रवासाचे अव्वाच्या सव्वा भाडे घेऊन लुट होत आहे.