बीड : बीड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोढा कुर्ला रोड, बीड या ठिकाणी होणार असून मतमोजणीच्या परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी बीड जिल्हयाचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पाण्डेय यांनी लोकसभा मतमोजणी परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (३) लागू केले आहे.सदरील कलमान्वये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परीसरात १५०० मिटर परिसरात ५ किंवा ५ पेक्षा जास्त व्यक्तीनी जमणे, अनधिकृत व्यक्तीने वावरणे व फिरणे, बेकायदेशिर कृत्य करणे, घोषणाबाजी करणे, ध्वनीक्षेपक वाजवणे, मतमोजणी केंद्राच्या परिसरात वाहन आणणे, तसेच भ्रमणध्वनी वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश लागू असलेल्या परिसरात शासकिय कर्तव्य पार पाडणाऱ्या मतदान प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत. शासकीय वाहनाव्यतिरिक्त इतर अनधिकृत वाहनांना १५०० मीटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम, मयताची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत.हा आदेश बीड लोकसभा मतमोजणी हद्दीतील वर नमूद ठिकाणी २३ मे रोजी सकाळी ६ वाजेपासून ते २४ मे २०१९ रोजी ६ वाजेपर्यंत लागू राहतील, असेही या आदेशात नमूद केले आहे.
बीड लोकसभा निवडणूक मतमोजणी केंद्राच्या परिसरात १४४ कलम लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:25 AM