अंबाजोगाई :
निसर्गाच्या सानिध्यात इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा एक अनोखा छंद असलेल्या गटपट ग्रुपने अंबाजोगाई परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या. संकलेश्वर मंदिर (बाराखांबी), हत्तीखाना लेण्या म्हणजे स्थापत्यशास्त्रातील एक उत्तम कलाकृतीच आहेत. ही प्राचीन कला पाहून ग्रुपचे सर्वजण अंतर्मुख झाले.
'अंबानगरी' अर्थातच बीड जिल्ह्यातील एक प्राचीन नगर आज 'अंबाजोगाई' या नावाने ओळखलं जातं. आद्यकवी मुकुंदराजांच्या वास्तव्याने मराठी भाषेची जननी संबोधल्या जाणाऱ्या या गावाच्या परिसरात, दासोपंत महाराजांची समाधी आहे. उत्तम शिल्पकलेचा नमुना असलेले खोलेश्वरचे मंदिर, शिवाय योगेश्वरी देवीचे शक्तीपीठ, रेणुका माता मंदिर, नागनाथ - बुट्टेनाथ, काशिविश्वेश्वर यांची पुरातन मंदिरे तसेच 'हत्तीखाना', नागझरी कुंड आदी ठिकाणे प्रसिद्ध आहेत. हा वारसा गटपट ग्रुपने समजून घेतला.
पोखरी (ता. अंबाजोगाई) येथील लोकमान्य टिळक विद्यालयात शिक्षकांचा गटपट रचनेच्या माध्यमातून चालणारा ग्रुप कार्यरत आहेे. मुख्याध्यापकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश आहे. यातील पाच शिक्षकांनी परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी छायाचित्रणही केले. एकमेकांशी चर्चा करीत आसपासच्या नागरिकांकडून काही जुजबी माहिती मिळवली.
दुपारच्या रणरणत्या उन्हात मुख्याध्यापक सुनील वसमतकर, गटपट रचनाप्रमुख सतीश बलुतकर, विष्णू तेलंगे, सदस्य नितीन चौधरी आदींच्या सहवासात केलेली या ऐतिहासिक भटकंतीतून सोबत्यांनी पूर्वजांच्या कला आणि कौशल्याचा इतिहास जाणून घेतला. ११व्या शतकातील यादवकालीन संकलेश्वर (बाराखांबी) मंदिराच्या उत्खननात शोध लागलेल्या नवीन मंदिराची रंगशिळा, अनेक दुर्मीळ मूर्तींसह विष्णूची पुरातन मूर्ती तसेच चुन्यापासून तयार केलेल्या मूर्तीचे भाग, खापरी भांड्याचे तुकडे, दगडी शिळेच्या रेखीव पायऱ्या, विविध भौमितिक आकृत्या पाहिल्या. पुरातत्व विभागाने सुरक्षित शेडखाली जतन केलेल्या विविध मूर्त्यांचे निरीक्षण केले.
भटकंतीत आढळली दुरवस्था
नजीकच्या परिसरात भटकंती करताना 'हत्तीखाना' या नावाने प्रसिध्द प्राचीन लेण्याही त्यांनी बघितल्या. आज ही लेणी अतिशय दुर्लक्षित अवस्थेत आहे. ही लेणी शिवलेणी गुहा, जोगाई मंडप या नावानेही ओळखली जाते. एक समृद्ध आणि संपन्न कालखंडाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या लेण्यांची सध्याची दुरवस्था पाहता येत्या काळात या परिसराची स्वच्छता करून सुशोभिकरणाचे काम हाती घेण्याचा मानस गटपट ग्रुपने व्यक्त केला.
इतिहासाच्या पाऊलखुणा
अभ्यास दौऱ्यात परिसरातील विविध स्थळांना भेटी देत आत्मिक आनंद मिळविणे एवढेच उद्दिष्ट साध्य न करता इतिहासातील हरवलेल्या पाऊलखुणा शोधून आणि मनाच्या गाभाऱ्यात कोरल्या गेलेल्या अशा ऐतिहासिक वारसांचा शब्दांच्या रुपात खऱ्या अर्थाने प्रचार आणि प्रसार व्हावा, अशी अपेक्षा ग्रुपचे प्रमुख सतीश बलुतकर यांनी व्यक्त केली.
===Photopath===
190321\19bed_1_19032021_14.jpg
===Caption===
पोखरी येथील गटपट ग्रुपने अंबाजोगाई येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देत प्राचीन शिल्पकलेचे निरीक्षण व अभ्यास केला.