माजलगाव (जि. बीड) : शहरालगत असलेल्या मनूर शिवारात शुक्रवारी सकाळी ११च्या सुमारास शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना अचानक बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे त्यांनी गावात धूम ठोकली. या घटनेने सावध झालेले प्रशासन हा प्राणी बिबट्याच आहे का, याचा शोध घेत आहे.
एक महिन्यापूर्वी सावरगाव शिवारात शेतकऱ्यांना बिबट्यासदृश प्राण्याचे दर्शन झाले होते. तेव्हापासून लोक दहशतीत होते. काही दिवसानंतर तेथे तडस असल्याचे वनविभागाने सांगितले. त्यानंतर २७ डिसेंबर रोजी शहरापासून ५ किमी अंतरावर फुले पिंपळगाव शिवारात नवीन मोंढा व टीएमसी केंद्र परिसरात रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ते कल्याण गुंजकर हे आपल्या मित्रासह बीडहून माजलगावकडे येताना त्यांना बिबट्या जात असल्याचे दिसून आले. आता शुक्रवारी भरदिवसा सकाळी ११च्या सुमारास बिबट्या दिसल्याने मनूर परिसरात खळबळ उडाली. याबाबत प्रशासनाने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले असून, पायाचे ठसे अस्पष्ट दिसत असल्याने अद्याप तो प्राणी कोणता, याचा शोध लागलेला नाही.