दिंद्रुड ( बीड ) : माजलगाव तालुक्यातील आनंदगाव येथे शेतकऱ्याने सोमवारी रात्री वाघीण व दोन बछडे पाणवठ्यावर आढळून आल्याचा दावा केला आहे. या भागात काही वर्षांपूर्वी वाघाने दर्शन दिले होते. यामुळे आता पुन्हा एकदा शेतात वाघ आणि बछडे दिसल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
अशोक डाके असे वाघ पाहणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी रात्री शेतात असताना एका पाणवठ्यावर त्यांना एक वाघीण व दोन बछडे दिसून आल्याचे डाके यांनी सांगितले. त्यांनी लागलीच याची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी माहिती वन विभाग व माजलगाव तहसील कार्यालयास दिली आहे. दरम्यान, चार दिवसांपूर्वी येथील संभाजी लांडगे यांच्या शेतात एक गाय मृतावस्थेत आढळून आली होती. शेतकऱ्यांना कुत्र्याने हल्ला करून गायीची शिकार केल्याचा संशय आल्यामुळे गावकऱ्यांनी मृत गाय शेतात पुरली. वाघ दिसल्याची वार्ता सर्वत्र पसल्याने आनंद गाव व परिसरातील शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत.
दरम्यान, सात वर्षांपूर्वी येथील गिरीश थावरे यांच्या शेतात एक बिबट्या वनविभागाने जेरबंद केला होता. या घटनेनंतर या परिसरात पुन्हा वाघीण व दोन बछडे आल्याच्या बातमीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड घबराहट निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तहसील प्रशासनाने याची दखल घेत वन विभागाला तत्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. शेत शिवारात काही पंज्याचे निशाण आढळून आले आहेत. याच्या तपासणी अंती आणि वन विभागाचा पंचनाम्यानंतरच अधिक माहिती मिळू शकेल.
पंचनामा करण्याचे आदेश आनंदगाव ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिली असून वन विभागास घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत - वैशाली पाटील, तहसीलदार, माजलगाव