माजलगाव : येथील महूल विभागाला हाताशी धरून माजलगाव तालुक्यातील कौडगावथडी येथील गोदावरी पात्रातून जेसीबी व पोकलेनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याने काहीच कारवाई होत नव्हती. यामुळे या भागातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्यानंतर अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या पथकाने गोदावरी पात्रात वाळू उपसा करत असलेल्या दोन पोकलेन मशीनसह ४० ब्रास वाळू जप्त करत कारवाई केली. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.
कोरोना साथीविरुद्ध एकीकडे संपूर्ण देश लढत असताना व लॉकडाऊन असल्याने सर्व व्यवहार ठप्प असताना वाळू माफियांनी महसूल खात्याला हाताशी धरून अवैध वाळू उपसा सुरूच ठेवला आहे. माजलगाव तालुक्यातील कौडगावथडी येथे रात्रंदिवस अवैधरीत्या वाळू उपसा होत असल्याने गावकऱ्यांनी वारंवार महसूल विभागाकडे तक्रारी केल्या. परंतु महसूल विभाग याप्रकरणी कारवाई करत नसल्याने नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. गुरुवारी पहाटे जिल्हाधिकाऱ्यांच्या पथकाने या ठिकाणी येऊन कारवाई केली.
अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शरद झाडगे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी कारवाई करत दोन पोकलेन ताब्यात घेतले तसेच ४० ब्रास वाळू जप्त केली. या वेळी केजचे तहसीलदार, माजलगावच्या तहसीलदार वैशाली पाटील, केज, अंबाजोगाईचा पोलीस ताफा आणि माजलगावचे मंडळ अधिकारी विकास टाकणखार, मुळाटे, तलाठी वाघमारे, आडगे, भदे, वाघचौरे, शीलवंत, इंगळे, वोवे, ईरमिले आदींचा समावेश होता. या प्रकरणी संबंधित वाळू उपसा करणारे व पोकलेनचा शुक्रवारी दुपारपर्यंत पंचनामादेखील करण्यात आला नव्हता व यावर ग्रामीण पोलीस ठाण्यात कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.
शासनाने गव्हाणथडी आणि आडोळा या दोन ठिकाणी वाळूचे टेंडर काढले आहे. या ठिकाणी टेंडर धारकांनी करोडो रुपये भरून टेंडर घेतले. यामुळे यांना वाळू कमी भावात देणे परवडत नाही. परंतु कौडगावथडी, मोगरा, सांडसचिंचोली, गंगामसला, सादोळा, आबेगाव, बोरगाव, मंजरथ आदी ठिकाणांवरून अवैध वाळू उपसा करून कमी भावात विक्री करत असल्याने टेंडर घेणारे अडचणीत आले आहेत.
===Photopath===
140521\img_20210514_113146_14.jpg