- नितीन कांबळे कडा - विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तलकरून विक्रीसाठी साठलेले २०० किलो मांस शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आष्टी पोलिसांनी तलवार नदी परिसरातून जप्त केले आहे. याप्रकरणी दोघांवर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आष्टी शहरातील तलवार नदीच्या किनाऱ्या लगत कुरेशी गल्ली येथे विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करून मांस विक्री करण्यासाठी साठवल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळाली होती. यावरून पोलिसांनी छापा टाकून २०० किलो मांस ( बाजारमूल्य ३६००० हजार रू. ) जप्त केले.
याप्रकरणी शाकेर कुरेशी आणि अरबाज शाकेर कुरेशी ( रा.आष्टी ) यांच्या विरोधात आष्टी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक प्रमोद काळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार आहेत.
ही कारवाई आष्टी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, उपनिरीक्षक प्रमोद काळे, अजित चाटे, पोलिस उपनिरीक्षक सातव यांनी केली.