बीड : तुम्ही वृद्ध आहात... तुम्हाला कोरोना झाला आहे... तर घाबरून जाऊ नका... मनाला धीर द्या आणि उपचाराला साथ द्या... जिल्ह्यात अशाच १२ हजार ५९८ वृद्धांनी कोराेनावर मात केली आहे. दुर्दैवाने १ हजार ३३० लोकांचा बळीही गेला असला तरी कोरोनामुक्तीचा टक्का समाधानकारक आहे. ‘लोकमत’ने काही ज्येष्ठांशी संवाद साधला असता त्यांनी कोरोनाला हरवून आल्यानंतर आत्मविश्वासाने इतरांनाही बळ दिले.
जिल्ह्यात आतापर्यंत ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले १४ हजार ३२७ लोक कोरोनाबाधित झाले आहेत. पहिल्या लाटेत हा आकडा जास्त होता; परंतु दुसऱ्या लाटेत कोरोनाने तरुणांनाही लक्ष्य केले होते. असे असले तरी सुरुवातीपासूनच काही ज्येष्ठ कोरोनाशी जिद्दीने लढले आहेत. बाधितांच्या संपर्कात येताच अथवा थोडीही लक्षणे जाणवताच त्यांनी घाबरून न जाता कोरोना चाचणी केली. यात जे पॉझिटिव्ह आले, त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल होत उपचार घेतले. त्यामुळे त्यांना त्रास झाला नाही, तसेच कोरोनावर मात करून ते बाहेर पडले. आज जे लोक कोरोनाबाधित आहेत किंवा कोरोनाला घाबरून चाचणी न करता आजार अंगावर काढत आहेत, अशांना ते आधार देत असल्याचे दिसत आहे. यात त्यांचा आत्मविश्वास दांडगा दिसतो. त्यामुळे ज्येष्ठांनी कोरोनाबाधित आले तरी तात्काळ रुग्णालयात दाखल व्हावे. घाबरून न जाता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला ऐकून उपचारास प्रतिसाद देण्याची गरज आहे. कोणीही दुखणे अंगावर काढू नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
---
आम्हाला कोणीही हरवू शकत नाही
मी सुरुवातीला घाबरले होते; परंतु डॉक्टरांनी आधार दिला. पाटोद्याच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेऊन सुखरूप घरी परतले. येथे जेवण आणि उपचार व्यवस्थित मिळाले. सर्वांना एकच विनंती आहे की, कोणीही घाबरून अंगावर दुखणे काढू नये. सर्वांनी आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी.
-इंदूबाई बाबूराव कदम, रा. सौंदाना, ता. पाटोदा
---
माझे वय ७४ आहे. माझा मुलगा डॉक्टर आहे. पॉझिटिव्ह आलो तेव्हा घाबरलो होतो. एचआरसीटी स्कोअरही ११ होता. सर्व घाबरले होते; परंतु मी धीराने सामना करीत होतो. १० दिवस उपचार घेतले आणि कोरोनाला लोळवून सुखरूप घरी परतलो. विशेष म्हणजे मला एकही रेमडेसिविर इंजेक्शन लागले नाही.
-द्वारकादास कासट, बीड
---
...अशी आहे आकडेवारी
६० वर्षांवरील आतापर्यंतचे रुग्ण
एकूण रुग्ण १४,३२७
कोरोनामुक्त १२,५९८
मृत्यू १,३३०
उपचार सुरू ३९९
===Photopath===
080621\08_2_bed_12_08062021_14.jpeg~080621\08_2_bed_11_08062021_14.jpg
===Caption===
द्वारकादास कासट~इंदुबाई कदम