अंबाजोगाई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. असे असले तरी नागरिकांना किराणा, दूध, भाजीपाला, फळे यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा भासु नये. यासाठी सरकार विशेष खबरदारी घेत आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली. अशा स्थितीत अंबाजोगाई शहर व तालुक्यातील काही दुकानदारांकडून किराणा सामानासह जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री केली जात आहे. खाद्यतेल, डाळी यांसह इतर वस्तुंचे व पदार्थांचे भाव पाच ते दहा रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. ही दरवाढ नेमकी कोणाच्या आदेशाने झाली, हे दुकानदार सांगत नाहीत. यामुळे गोरगरीब व सामान्य नागरिकांची मोठी पिळवणूक होत आहे. संपूर्ण देश संकटात सापडलेला आहे. प्रत्येक जण आपले जीवन वाचविण्यासाठी धडपडत आहे. अशा स्थितीतही लूट करणाऱ्या माणुसकीशून्य दुकानदारांवर कारवाई करावी. त्यांचे व्यवसाय परवाने रद्द करण्यात यावेत. त्यांचे गोडाउन तपासून साठेबाजीची खात्री करावी. वैधमापन विभाग तसेच अन्न व औषध प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री; यंत्रणेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 4:33 AM