बीड: गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पुन्हा जेलमध्ये पाठवा या मागणीसाठी महिला अत्याचार विरोधी कृती समितीचे आंदोलन समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले.
२००२ मध्ये गुजरात राज्यात झालेल्या दंगलीत बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचार झाला. या प्रकरणी दोषी ठरलेल्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या ११ गुन्हेगारांना गुजरात सरकारने १५ ऑगस्ट रोजी माफी करुन सोडले. त्यामुळे बिल्कीसच्या कुटूंबावर दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या ७५ व्या महोत्सवा प्रसंगी देशाला उद्देशून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नारी का सन्मान करना चाहिये, असे लाल किल्ल्यावरुन संबोधन केले. त्याच दिवशी त्यांच्या राज्यात आरोपीची शिक्षा माफ करुन त्यांना मोकाट सोडले आहे. ही बाब अतिशय घृणास्पद आणि अस्वस्थ करणारी आहे. अशांमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढत आहे. त्यामुळे सोडलेल्या आरोपींना तात्काळ अटक करुन पुन्हा जेलमध्ये पाठवा, बिल्कीस व त्यांच्या कुटूंबियांना संरक्षण द्यावे यासह इतर मागण्या आंदोलकांनी मांडल्या.
आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनास सादर केले. आंदोलनात सुशीला मोराळे, प्रा. किसकिंदा जाधव, प्रतीक्षा बोराडे, अंजली कुलकर्णी, शैलजा सोनके, राजश्री चौरे, संगीता दराडे, कावेरी नागरगोजे, शारदा अडागळे, बुशरा काझी, सारिका गदळे, शहातरीन पठाण, फरजाना बाजी सय्यद, सुरेखा बडे, रिझवान पठाण, अनिता वडमारे, प्रा. सुक्षाला वायबसे, देविदास चव्हाण, बबनराव आंधळे, सुरेखा आडागळे, ज्याेती वडमारे, आशा मुंढे, शाहीन पठाण यांच्यासह इतर महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.