बीड : कोरोना लस मिळावी, यासाठी १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थी वाट पाहून आहेत. तर दुसऱ्या बाजूला ४५ वर्षांवरील लोकांसाठी लस उपलब्ध असतानाही ते पुढे येत नसल्याचे वास्तव जिल्ह्यात सध्या पाहावयास मिळत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यात तब्बल ३१ हजार ५५० लसीचे डोस शिल्लक होते. सध्या केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३ लाख ३९ हजार ८६१ लोकांना लस देण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या पाहता हा आकडा अतिशय कमी असल्याचे दिसते. त्यातच मागील महिनाभरापासून केवळ ४५ वर्षांवरील लोकांना लस दिली जात आहे. गर्दी टाळण्यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक केली आहे. यासाठी गावोगावी शिक्षकांची नियुक्ती केली असली तरी याला अद्याप प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. त्यामुळे लसीकरणाची गती संथ असल्याचे दिसते.
दरम्यान, १८ ते ४४ वयोगटातील लोकांना कोरोना लस मिळण्याची प्रतीक्षा आहे. शासन आणि आरोग्य विभाग लस देण्याबाबत कधी घोषणा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच लस उपलब्ध असतानाही केवळ नियमात नसल्याने १८ ते ४४ वयोगटातील लोकांना आरोग्य विभाग लस देऊ शकत नसल्याचे दिसते. यामुळे आरोग्य विभागाला विनाकारण रोषाला बळी पडावे लागत असल्याचे दिसते. शासनाने १८ ते ४४ वयोगटातील लोकांनाही लस द्यावी, अशी मागणी होत आहे.
....
कोविशिल्डचे २५ हजार डोस
जिल्ह्यात सध्या कोव्हॅक्सिन ही लस केवळ दुसरा डोस असणाऱ्यांना दिली जात आहे. तर कोविशिल्ड ही लस नव्या लाभार्थ्यांना दिली जात आहे. सध्या कोव्हॅक्सिनचे ६ हजार १६० डोस शिल्लक असून ३१ हजार ५५० कोविशिल्डचे डोस शिल्लक आहेत. एवढे डोस शिल्लक असतानाही ज्येष्ठ लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे दिसत आहे.
....
सध्या ४५ वर्षांवरील लोकांनाच लस दिली जात आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी बंधनकारक आहे. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद आहे. सध्या कोव्हॅक्सिनचे ६,१६० तर कोविशिल्डचे २५,३९० डोस शिल्लक आहेत.
- डॉ. संजय कदम, नोडल ऑफिसर, कोरोना लसीकरण, बीड.
---
आतापर्यंत झालेले लसीकरण
१८ ते ४४ - ४९,३६०
४५ ते ६० - २,३६,९०५
६० वर्षांपुढील - १,५३,५६१