- संतोष स्वामीदिंद्रुड (बीड) : मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज दुपारी धारूर तालुक्यातील तेलगाव येथे आयोजित घोंगडी बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की, "फडणवीस हे आ. राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु मराठा समाज त्यांच्या या खेळीला ओळखून आहे आणि ती यशस्वी होऊ देणार नाही."
मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, "सरकारने मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण दिल्यास आम्ही राजकारणात सहभागी होणार नाही. परंतु जर आरक्षण दिले नाही, तर आम्हाला पुढील पाऊले उचलावी लागतील." या इशाऱ्यानंतर त्यांनी मराठा समाजाला एकजुटीचे आवाहन केले.
घोंगडी बैठक सकाळी ११ वाजता सुरू होणार होती, परंतु ती दुपारी तीन वाजता भर पावसात सुरू झाली. शेकडोचे संख्येने उपस्थित समाज बांधवांसमोर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर ठामपणे उभे राहत, "राजकारणाची लालसा नसल्याचे" सांगितले आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा संकल्प व्यक्त केला.
पुढील काही दिवसांत बार्शीत आ. राऊतांच्या विरोधात सभा घेणार असल्याचे जाहीर करत त्यांनी आ. राऊत यांना "पोपटपंची" न करण्याचा इशारा दिला. आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने सावध भूमिका घेण्याचे आवाहन करत, "जो आपल्याला आरक्षण देईल, तोच आपला" असा स्पष्ट संदेश दिला.