बीड : मुख्यालयी राहणे आवश्यकच आहे, हे मान्य आहे. परंतू निवास्थाने नाहीत, आहेत तिथे पडझड झालेली आहे. ग्रामीण भागात किरायाणे घर मिळत नाही. मुलांचे शिक्षण, कुटूंबाच्या अनेक अडचणी आहेत. सोयी, सुविधा काहीच नाहीत, मग मुख्यालयी रहायचे कसे? असा सवाल उपस्थित करत डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळीच काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले आहे. आगोदर आमच्या समस्या सोडवा आणि मगच मुख्यालयाचे बोला, असेही त्यांनी म्हटले आहे.
आरोग्य विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व अधिकारी, डॉक्टर, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. जे राहणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते यांनी सर्वांना मुख्यालयी राहण्याच्या सुचना केल्या. बुधवारी रात्री अचानक ‘मिशन सतर्क’ मोहिम राबवून मुख्यालयी न राहणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा पंचनामा केला. यात तब्बल ५७ डॉक्टर, कर्मचारी गैरहजर आढळले. या सर्वांना नोटीस बजावल्या जाणार आहेत. डॉ.गिते यांनी आयुक्तांच्या आदेशाचे पालन केले.
दरम्यान, मुख्यालयी राहणे आवश्यक असले तरी आमच्याही सोयी, सुविधांचे पहावे, आमच्या अडचणी सोडवाव्यात, कामाचे तास निश्चीत करावेत, सुरक्षेची हमी घ्यावी यासारख्या विविध मागण्या डॉक्टर कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. सुविधा नसतानाही मुख्यालयी राहण्याबाबत केलेल्या सक्तीचा निषेध म्हणून शुक्रवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज सुरू केले. आता दोन दिवसानंतर माेठे आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे. असे असले तरी अद्यापही साधे निवेदनही एकाही संघटनेने दिलेले नाही. त्यामुळे आतापर्यंत तरी संघटना केवळ सोशल मिडीयावरच ॲक्टीव्ह असल्याचे दिसत आहे.
आमच्याही समस्या आहेत मुख्यालयी रहायला काहीच अडचण नाही. परंतू काही ठिकाणी निवासस्थाने नाहीत, जेथे आहेत तेथे अवस्था बिकट आहे. पाणी, वीज अशा सुविधा नाहीत. ग्रामीण भागात किरायाणे घर मिळत नाही. आमच्या कामाचे तास निश्चीत नाहीत. आमच्या पण खुप समस्या आहेत. यावरही मार्ग काढावा आणि मग मुख्यालयी राहण्याबाबत बोलावे. प्रशासनाचा निषेध म्हणूनच आज जिल्हाभरात काळ्या फिती लावून कामकाज करत आहोत. सोमवारी यावर पुढील निर्णय घेतला जाईल.- डॉ.नितीन मोरे, कार्याध्यक्ष, मॅग्मो संघटना बीड