पाण्याचा अपव्यय
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक ठिकाणी व्हॉल्वला गळती लागली आहे. ज्या वेळेस पाणी सोडण्यात येते त्या वेळी या व्हॉल्वमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते. एकीकडे नगर परिषद प्रशासन पाणी बचतीचे आवाहन करीत आहे तर दुसरीकडे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही गळती काढण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना करूनही तो याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे.
शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली
अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर बस स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. हे जनावरे मुख्य रस्त्यातील आजूबाजूच्या व्यापारी संकुलांत घुसून त्या परिसरातही घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ सर्वत्र वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.
बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय
अंबाजोगाई : शासकीय, निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयींचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढते.
प्लास्टिकमुळे शेतीच्या सुपीकतेला धोका
अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणाऱ्या रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुपटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.