बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र गुरुवारीही कायम होते. गुरुवारी पुन्हा सात मृत्यूंची नोंद झाली. यात जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच रुग्णांचा समावेश आहे. तसेच १५४ नवे रुग्ण आढळले तर १४१ जणांनी काेरोनावर मात केली. वाढती रुग्णसंख्या मृत्यूसत्र कायम राहिल्याने चिंता व्यक्त होत आहे.
राज्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध उठविले जात आहेत. असे असले तरी बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याचे दिसते. रोज १०० ते १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळत असून ५ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. त्यातच आता रुग्णसंख्या कमी झाल्याचे कारण सांगत मनुष्यबळ कमी केले जात आहे. त्यामुळे उपचाराबद्दलच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गुरुवारी नोंदवलेल्या सातपैकी पाच मृत्यू हे एकट्या जिल्हा रुग्णालयातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्याकडून केवळ कागदोपत्री राऊंड घेतला जात आहे. त्यांच्या राऊंडने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना काहीच फरक पडत नसल्याचे यापूर्वीही उघड झालेले आहे. वॉर्डात काही कामचुकार डॉक्टर, कर्मचारी आजही रुग्णसेवेत हलगर्जी करत असल्याचे दिसते. त्यांच्यावर कारवाई करण्यास मात्र सीएस व एसीएस आखडता हात घेत आहेत. केवळ कारवाईचा इशारा देऊन वेळ मारून नेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून कामचुकारांना अभय मिळत आहे.
येथे आढळले नवे रुग्ण
कोरोना संशयित असलेल्या ६ हजार ५९० लोकांचे गुरुवारी अहवाल प्राप्त झाले. यात १५४ पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई २, आष्टी ५६, बीड १७, धारूर ८, गेवराई १२, केज ११, माजलगाव ७, पाटोदा १६, शिरूर १६, वडवणी ९ येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९९ हजार ३२७ एवढा झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९४ हजार ६२० एवढी असून २ हजार ६६६ जणांचा मृत्यू झाला आहे.