अंबाजोगाई : कर्जबाजारी झालेल्या पतीने ‘माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये’ म्हणत पत्नीकडे तगादा लावला होता. पत्नीने नकार देताच संतापलेल्या पतीने तिला आणि मुलांना घराबाहेर काढत घर पेटवून दिले. या घटनेत घरातील दोन लाखांचे सामान जळून खाक झाले. ही घटना अंबाजोगाई शहरात रविवारी रात्री घडली.याप्रकरणी सुलोचना रवी निकम या महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार चौदा वर्षापूर्वी तिचे लग्न रवी तुकाराम निकम याच्यासोबत झाले. सुरुवातीचे काही वर्ष चांगली गेल्यानंतर रवीने कामधंदा न करता लोकांकडून पैसे उसने घेऊन खर्च करण्यास सुरुवात केली. याच कारणामुळे तो माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीला मारहाण करू लागला. याबाबत पत्नीने पोलिसांत तक्रारही केली होती. त्यानंतर सततच्या त्रासाला कंटाळून सुलोचना माहेरी निघून गेल्या होत्या. त्यावेळी यापुढे त्रास देणार असे लिखित स्वरुपात देऊन रवीने पत्नीला परत आणले. परंतु, अवघ्या एका महिन्यातच रवीने पैश्यासाठी पत्नीचा पुन्हा छळ सुरु केला आणि जीवे मारण्याच्या धमक्या देऊ लागला. घाबरलेल्या पत्नीने अनेकदा रात्री गच्चीवर अथवा बाथरूममध्ये लपून काढल्या.रविवारी रात्री १० वाजता रवी घरी आला आणि मला लोकांचे देणे द्यायचे आहे, माहेरहून दहा लाख रुपये घेऊन ये अन्यथा तुज्या नावावरील जमीन विक म्हणून त्याने पत्नीला मारहाण सुरु केली. परंतु,‘माझ्या आईवडिलांनी आतापर्यंत खूप पैसे दिले आहे, आता त्यांची पैसे देण्याची ऐपत नाही’ असे सांगत सुलोचना यांनी पैसे आणण्यास नकार दिला.यामुळे चिडलेल्या रवीने तुम्ही घरात राहायचे नाही म्हणत पत्नीला आणि दोन मुलांना घराबाहेर काढले आणि रॉकेल ओतून घर पेटवून देत घराला बाहेरून कुलूप लावले. सुलोचनाचा आरडाओरडा ऐकून आजूबाजूचे लोक गोळा झाले परंतु घराला बाहेरून कुलूप असल्याने त्यांना आग विझविता आली नाही. या आगीत घरातील सामान, कपडे, मुलांची पुस्तके आदी जळून खाक झाले.याप्रकरणी सुलोचना निकम यांच्या फिर्यादीवरून रवी याच्यावर अंबाजोगाई शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पत्नीला धमकावण्यासाठी स्वत:चे घर पेटविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 11:57 PM