परळी ( बीड ) , दि. 21 : शहरात शारदीय नवरात्रोत्सवास आज उत्साहात प्रारंभ झाला. शहरातील कालरात्रीदेवी मंदिर व शहरापासून जवळच असलेल्या डोंगरतुकाई मंदिरात उत्सवाला सुरुवात झाली आहे. आजपासून या मंदिरात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी होत आहे.नऊ दिवस या ठिकाणी देवीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. तर शहरात पंधरा सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दुर्गामातेची शहरातून वाजतगाजत मिरवणुक काढून देवीची स्थापना करण्यात आली. आई राजा उदो उदो, अंबा बाईचा उदो उदो असा जयघोष करीत दुर्गामातेची अनेक भक्तांनी दर्शन घेतले. ग्रामिण भागातही सार्वजनिक दुर्गोत्सवाच्या वतीने नवरात्रोत्सवास प्रारंभ केला आहे.
संभ्रमावस्था नाश करणारी देवी म्हणून परळीची कालरात्रीदेवी प्रसिध्द आहे. गणेशपार जवळील भागात कालरात्री देवीचे पुरातन मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून भक्त येतात तर आरोग्य भवानी म्हणून परळी पासून ३ कि.मी.अंतरावर असलेल्या डोंगर तुकाई देवी ओळखली जाते. या देवीच्या दर्शनासाठी राज्यातूनच नव्हे तर परराज्यातूनही भक्त नवरात्रीत हमखास येतात.
कालरात्री देवी मंदिर व डोंगर तुकाई मंदिरमध्ये घटी बसतात अशांसाठी श्री वैद्यनाथ ट्रस्टने दोन्ही मंदिरात पिण्याचे पाणी, राहण्याची व्यवस्था, लाईटची व्यवस्था, जनरेटरची व्यवस्था करुन ठेवली आहे. तसेच इतर भक्तांचीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. अशी माहिती श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी राजेश देशमुख यांनी दिली. मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्तही नियुक्त करण्यात आला आहे.
नवरात्री निमित्त श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व सावजी समाज परळीच्यावतीने वैद्यनाथ मंदिराच्या दर्शन मंडपात श्रीमद् देवी भागवत कथेस गुरुवारपासून प्रारंभ करण्यात आला आहे. कथा प्रवक्ते श्री श्री आशीषानंदजी महाराज धारुरकर हे असून दि.२१ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर दरम्यान दररोज दु.०२ ते ०५ भागवत कथा होणार आहे. या भागवत कथेचा लाभ घेण्याची आवाहन संयोजकाच्यावतीने करण्यात आले आहे.
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्यावतीने कालरात्री देवी मंदिर व डोंगर तुकाई मंदिर येथे रंगरंगोटी करण्यात आली असून विद्युत रोषणाई केली आहे. तसेच भक्तांसाठी लोखंडी बॅरीकेटस् ची व्यवस्था करण्यात आली आहे. कालरात्री देवी मंदिर व डोंगर तुकाई मंदिर परिसरात वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने सिसिटीव्ही बसविण्यात आले आहेत.