परळी : येथील प्रभू वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने बुधवारी प्रभू वैद्यनाथाची सवाद्य पालखी मिरवणूक काढून तीन दिवसीय महाशिवरात्र महोत्सवाची सांगता करण्यात आली.वैद्यनाथ भगवान की जय असा जयघोष पालखी मिरवणुकीत भाविक करीत होते. ठिकठिकाणी पालखीचे स्वागत करुन भाविकांनी दर्शन घेतले. ४ मार्र्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रुद्राभिषेक झाला. ५ मार्च रोजी सोमयाजी दीक्षित यज्ञेश्वर महाराज सेलूकर यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ मंदिरालगत श्री सूक्तहवन झाले. ६ मार्च रोजी सायंकाळी पालखी मिरवणूक निघाली. देशमुख पाराजवळ पं. हेमंत पेंडसे यांचा भक्तीगीत अभंगवाणीचा कार्यक्रम झाला. रात्री ९ वाजता अंबेवेस भागात शोभेची दारु उडविण्यात आली. त्यानंतर पालखी मंदिरात परतली.गोकुळ आवारे ठरला ‘परळी केसरी’चा मानकरीपरळी नगर परिषदेच्या वतीने महाशिवरात्र महोत्सवानिमित्त कुस्त्यांची दंगल आयोजित केली होती. अमर मैदान येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती. स्पर्धेमध्ये १०० पासून ५१ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे मल्लांना देण्यात आली. स्पर्धेतील शेवटची कुस्ती गोकुळ आवारे या कुस्तीपटूने जिंकून रोख ५१ हजार रुपये जिंकले. तसेच ‘परळी केसरी’चा बहुमान मिळवत चांदीची गदा आपल्या नावे केली. पंच म्हणून सुभाष नाणेकर, नारायणदेव गोपनपाळे, शंकर बागवाले, गणपतराव मुंडे, श्रीहरी गीते, महादेव दहिफळे, अतुल दुबे, अजय जोशी यांनी काम पाहिले.
परळीत महाशिवरात्र महोत्सवाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 11:54 PM