सध्या कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले आहे. सर्वजण आपापल्या समाजबांधवांसाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांतील कोविड रुग्णांची संख्याही वाढत आहे. घरातील एका व्यक्तीस जरी कोविडची लागण झाली तर त्या परिवारातील जनजीवन हे विस्कळीत होते. ही जाणीव ठेवून अंबाजोगाई तालुका राजस्थानी परिवाराने समाजातील कोरोना झालेल्या बांधवांसाठी सेवा संकल्प योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेसाठी राजस्थानी परिवाराकडून भरभरून प्रतिसाद देत सर्वच समाजबांधव आपापल्या परीने मदत करत आहेत. या सेवा संकल्प योजनेत राजस्थानी समाजातील कोरोनाग्रस्त व्यक्तीला किंवा कुटुंबाला मोफत भोजन त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम केले जाणार आहे.
यासाठी दुपारच्या जेवणासाठी सकाळी ८ वाजेपर्यंत व संध्याकाळच्या जेवणासाठी दुपारी ३ पर्यंत दत्तप्रसाद लोहिया, संदीप पारीख, धनराज सोळके, संतोष भंडारी, ललित बजाज, आशिष रांदड, जगदीश जाजू, नीलेश मुथ्था, अधिकार मरलेचा, बालाजी मंत्री, रूपेश तापडिया यांना संपर्क साधून पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. ही सेवा संकल्प मोफत भोजन व्यवस्था अंबाजोगाई तालुका राजस्थानी सभेमार्फत राबविण्यात येणार आहे. या योजनेचे बीड जिल्ह्यातील सर्व राजस्थानी समाजाने स्वागत केले आहे.