परळी : कोरोना महामारीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संकट लक्षात घेऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी परळीत कोरोना रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘सेवायज्ञ’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत लक्षणे नसलेल्या परंतु कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण (आयसोलेशन) केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बाधित महिला रुग्णांच्या घरी तसेच कोविड पेशंट असलेल्या घरात ज्यांना आवश्यक आहे, त्यांनाही जेवणाचे डबे पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंकजा मुंडे व खा. डाॅ. प्रीतम मुंडे या दोघीही सध्या क्वाॅरंटाइन आहेत, त्यामुळे त्यांनी परळी मतदारसंघातील भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्हर्चुअल बैठक घेऊन संवाद साधला व सध्याच्या गंभीर परिस्थितीवर चर्चा केली. बैठकीस अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रारंभी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी सर्वप्रथम कोरोना काळात सर्वांना स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घेण्याचे आवाहन केले.
सेवायज्ञ सुरू करणार
कोविड काळात रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान सेवायज्ञ सुरू करणार आहे. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या ३ मे पुण्यतिथी दिनापासून ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या ३ जून पुण्यतिथीपर्यंत हा सेवायज्ञ होणार आहे. आवश्यकता भासल्यास तो पुढेही चालू ठेवणार आहोत. ही जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान घेणार असल्याचे सांगताच काही जणांनीदेखील या यज्ञात आपापल्या परीने योगदान देऊ, असे सांगितले.