बीड : गेल्या चोवीस तासांत चार वेगवगळ्या घटनांमध्ये जिल्ह्यात सात जणांना जलसमाधी मिळाली. मृतांमध्ये धायगुडा पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथील महिला वगळता इतर पाच ११ ते १५ वयोगटातील आहेत. तर कामखेडा येथील तीन भावंडांचा यात समावेश आहे.कामखेडा येथील शेख परवीन शेख इसाक या धुणे धुण्यास रविवारी सकाळी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले जिशान (१५), अफ्फान (११) व मुलगी सानिया (१३) हे देखील होते. कपडे धुताना जिशान पाण्यात पडला, त्याला वाचविण्यास गेलेली सानियाही पाण्यात पडली. त्या दोघांना वाचविण्यास अफ्फान पाण्यात उतरला. पण तिघेही बुडू लागले. यादरम्यान परवीन यांनीही मुलांना वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्या देखील बुडू लागल्या. तोवर गावातील तरुण तेथे पोहोचले होते. तरुणांनी जिशान, सानिया व परवीन यांना बाहेर काढले. जिशान व सानिया यांना जिल्हा रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंतर अफ्फानचाही मृतदेह बाहेर काढण्यात आला. अन्य घटनेत धायगुडा पिंपळा (ता. अंबाजोगाई) येथे धुणे धुण्यासाठी तळ्यावर गेलेल्या शांताबाई धर्मराज धायगुडे (४५) या महिलेचा रविवारी सकाळी पाय घसरुन पडल्याने बुडून मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत शिरुरघाट (ता. केज) येथे नदीवर पोहायला गेलेल्या बापू विजयकांत लोंढे व साहेबराव वैराळ या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. चौथी घटना शहापूर मजरा येथे घडली. आजोळी आलेल्या पवन झाडे याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. पोहायला शिकत असताना कमरेला बांधलेला प्लास्टिक कॅन निसटला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
बीडमध्ये सात जण बुडाले!
By admin | Published: October 10, 2016 5:11 AM