तालुक्यातील गंगाखेड मार्गावर दगडवाडी व लातूर रस्त्यावर धर्मापुरी येथे परळी ग्रामीण पोलिसांनी चेक पोस्ट उभारले आहे, तर तीन भरारी पथके नियुक्त केली आहेत. मंगळवारी पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलिसांनी विनामास्क, विनाकारण फिरणाऱ्या १५ दुचाकीस्वारांविरुद्ध तसेच सहा दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली. एकूण १७ हजार १०० रुपये दंड वसूल केला आहे. धर्मापुरी येथे चेक पोस्टवर १० शिक्षक व ८ पोलीस कर्मचारी नियुक्त केले आहेत, तर दगडवाडी येथील चेक पोस्टवर ६ पोलीस व १० शिक्षक नेमण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी सुरू केल्याची माहिती पो. नि. पुर्भे यांनी ‘लोकमत’ला दिली.
परळी शहरात गणपती मंदिर, आझाद चौक, राणी लक्ष्मी टॉवर या तीन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक चेक पोस्टवर दोन पोलीस कर्मचारी व दोन शिक्षक, दोन होमगार्ड, दोन न.प. कर्मचारी नेमले आहेत. दोन भरारी पथके तयार केली आहेत. येथे मंगळवारी विनामास्क व विनाकारण फिरणारे तसेच वेळेच्या आत दुकाने बंद न करता दुकाने चालू ठेवणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात आली. यात १८ हजार ५०० रुपये दंड वसूल झाल्याची माहिती परळी शहरचे सपोनि. अशोक खरात यांनी दिली. प्रभारी पोलीस निरीक्षक पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
संभाजीनगर पोलिसांनी शहरातील इटके कॉर्नर, श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल व नांदेड टी पॉइंट येथे चेक पोस्ट उभारले आहेत. येथे विनामास्क, विनाहेल्मेट वाहन चालकांवर कारवाई करून १० हजार ४०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे संभाजीनगर ठाण्याचे सपोनि. नारायण गीते यांनी सांगितले. शहरात विनाहेल्मेट दुचाकीचालकांवरही कारवाई करण्यात आली. सध्या ऑटोमोबाइलची दुकाने बंद आहेत, मग हेल्मेट आणायचे कोठून असा प्रश्न येथील युवक धनंजय शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
===Photopath===
040521\img-20210504-wa0503_14.jpg