लोकमत न्यूज नेटवर्ककेज : शहरातील विठाई पूरम या नामांकित वसाहतीमध्ये एका शिक्षकाच्या बंगल्यातच चालणाऱ्या तिर्रट नावाचा जुगार खेळताना सात जणांना पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून पकडले. या कारवाईत तीन दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
विठाई पुरम या वसाहतीत पत्त्याचा क्लब सुरू असल्याची खबर पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उप निरीक्षक सुरेश माळी यांच्या पथकाने शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास वसाहतीत छापा मारला.
यावेळी मातोश्री बंगल्याच्या पाठीमागे तिर्रट नावाचा जुगार स्वत:च्या फायद्यासाठी पैसे लावून खेळत असताना सूर्यकांत बाबुराव चौरे, शेषराव काशीनाथ कदम, सुरेश सीताराम अंबाड (तिघे रा. समर्थ नगर, केज), संतोष ज्योतीराम चौरे, अरुण कारभारी गर्जे (दोघे रा. विठाई पूरम, केज) अशोक पांडुरंग बारगजे (शिक्षक कॉलनी, केज) या शिक्षकांसह बालाप्रसादजी प्रल्हाद तापडिया (खामसवाडी ता. कळंब) यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून तीन दुचाकी, मोबाईल व नगदी रक्कम असा १ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहायक फौजदार प्रदीप सेंगर यांच्या फिर्यादीवरून सहा शिक्षकांसह एकूण सात जुगाºयांवर केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळी करीत आहेत.
महिलांच्या तक्रारीमुळे केली कारवाईविठाई पूरम वसाहतीतच पोलीस निरीक्षक शिरीष हुंबे हे किरायाने राहतात. पतीच्या जुगारी वृत्तीला कंटाळलेल्या काही महिलांनी आपली कैफियत हुंबे यांच्या कानावर घालत कारवाईची मागणी केली होती.शनिवारी हुंबे यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात आली. विठाई पुरम या वसाहतीत अलीकडे जुगारासारखे अवैध धंदे सुरु झाल्यामुळे वसाहतीच्या लौकिकाला धक्का बसला आहे.