- सोमनाथ खताळ
बीड : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून दररोज बाधितांचा आकडा १०० पेक्षा कमी येत आहे. तसेच महिना भरापासून रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील खाटा रिकाम्या दिसू लागल्या आहेत. हाच धागा पकडून आता आरोग्य विभागाने बीड, आष्टी, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, परळी या ठिकाणचे दोन पैकी एक कोविड केअर सेंटर बंद केले आहे. तसेच मनुष्यबळही कमी केले जात आहे.
आतापयर्यंत जिल्ह्यात १ लाख १७ हजार ४४१ लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, पैकी १२ हजार ४२८ जणांचा अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. तसेच जिल्ह्यात खाजगी व शासकीय असे ३ हजार ३६५ बेड असून, पैकी ९३२ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. अद्यापही २ हजार ४३३ बेड रिकामे आहेत. बेडचा तुटवडा सप्टेंबर महिन्यात जाणवला होता. सध्या सर्वत्र बेड उपलब्ध असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
खासगी कोविड सेंटरला दररोज १५ हजार खर्चजिल्ह्यात तीन ठिकाणी खाजगी कोविड केअर सेंटर आहेत. येथे दररोज १० ते १५ हजार रूपयांचा खर्च केला जातो. रुग्णांच्या सुविधा व इतर किरकोळ बिघाड, दुरूस्तीच्या वस्तूंवर हा खर्च होत आहे. रुग्ग्णालयांमध्ये डाॅक्टर, परिचारिकांची संख्या जास्त असते. परंतु कोवीड केअर सेंटरमध्ये ती दिसत नाही. लक्षणे नसल्याने कमी संख्या असल्याचा खुलासा आरोग्य विभागाने केला.
तक्रारी थांबल्या; जेवणही चवदारजिल्ह्यात सुरूवातीला प्रत्येक ठिकाणाहून तक्रारी येत होत्या. सध्या तरी कोविड केअर सेंटरबद्दल तक्रारी कमी आहेत. आरोग्य विभागाने आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेऊन त्यात सुधारणा केली आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने आणि सुधारणा केल्यामुळे रुग्णांमधून जास्त ओरड येत नाही. अधिकारीही तपासणी करतात. जेवणाचा दर्जा सुधारण्याची गरज आहे. यापूर्वी अंबाजोगाई येथे एका सेंटरमध्ये खराब जेवण दिल्याने कंत्राटदाराला २५ हजार रूपयांचा दंडही ठोठावला होता. त्यानंतर सर्वच कंत्राटदार सावध झाले आणि जेवणाचा दर्जा चांगला ठेवला.
२ हजार ४३३ बेड रिकामेसध्या कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. तसेच कोरोनामुक्तचा टक्काही ८५ पेक्षा अधिक झाला आहे. मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सध्या रुग्णसंख्या कमी झाल्याने बीड, आष्टी, माजलगाव, गेवराई, केज, अंबाजोगाई, परळी, येथील कोविड केअर सेंटर बंद केले आहेत. बेडही २ हजार ४३३ रिकामे आहेत. काळजी घ्यावी, काळजी करू नये.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड