बीड : नगर रचना कार्यालयाच्या परवानगीशिवाय ब्रम्हवाडी (ता. परळी) येथे अनधिकृत भूखंड तयार करून त्याची विक्री केल्याबाबत उपविभागीय कार्यालयाकडे जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबूराव पोटभरे यांनी तक्रार केली होती. उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखालील सात सदस्यीय समिती या भूखंड घोटाळ्याची चौकशी करणार आहे. २ सप्टेंबर रोजी यासंदर्भात सुनावणी होणार आहे.
ब्रम्हवाडी येथे सर्व्हे क्र. ४४ व ४८ मधील जमिनीमध्ये नगर रचना कार्यालयाकडून मंजूर अभिन्यासविना अनधिकृतपणे भूखंड तयार करून अल्पकालावधीच्या अकृषिक परवानगीचा आजतागायत बेकायदेशीर वापर केला गेला. या भूखंडाची विक्री केली गेली व ओपन स्पेस जागेचे रूपांतर भूखंडात करून त्याची विक्री करत जनतेची लुबाडणूक करण्यात आली, अशा आशयाची तक्रार जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बाबूराव पोटभरे यांनी २६ जुलै २०२१ रोजी उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्याकडे केली होती. त्यानुषंगाने उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी करणार आहे. तहसीलदार सुरेश शेजुळ हे सचिव असून, नगर रचनाकार सय्यद लईक, ज्ञानेश्वर बडई, मंडळाधिकारी यू. व्ही. उडते, भूमी अभिलेख उपअधीक्षक इंफाळ व तलाठी विष्णू गित्ते हे समितीत सदस्य असतील.
...
सुनावणीबाबत नोटीस
दरम्यान, समितीमार्फत चौकशी पूर्ण झाल्यानंतर २ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली जाईल. यावेळी सुनावणी होणार आहे. सुनावणीसाठी उपस्थित राहण्यासंदर्भात संजय शांतीलाल जैन व अजय शांतीलाल जैन यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
....
नगररचना कार्यालयाला अंधारात ठेवून भूखंड गिळंकृत करण्याचा हा प्रकार धक्कादायक आहे. असे बेकायदेशीर भूखंड सामान्यांना विक्री करून पैसे कमावणाऱ्यांना चाप लागला पाहिजे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. तोपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील.
- बाबूराव पोटभरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य, बीड
....