बीड : दीड वर्षापूर्वी अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी असलेल्या जालन्याच्या डॉक्टरसह गेवराईच्या बडतर्फ झालेल्या अंगणवाडी सेविकेने जामिनावर बाहेर येताच पुन्हा हा बाजार सुरू केला. याची टोल फ्री क्रमांकावर तक्रार येताच पोलिस व आरोग्य विभागाने सापळा लावत कारवाई केली.
एका गर्भवती महिला पोलिसाला रुग्ण बनवून तपासणीला पाठविण्यात आले. तपासणीला सुरुवात करताच अंगणवाडी सेविका आणि घरमालकाला ताब्यात घेण्यात आले; परंतु, जालन्याच्या डॉक्टरने तेथून पळ काढला. हा प्रकार गुरुवारी पहाटे सहाच्या सुमारास गेवराईतील संजयनगर भागात घडला. गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
२०२२ मध्येही हेच आरोपी५ जुलै २०२२ राेजी बीड तालुक्यातील बकरवाडी येथील शीतल गाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. या प्रकरणातही मनीष, डॉ. गवारेसह नऊ आरोपी होते. या सर्वांना अटक केली होती. डॉ. गवारे हा महिन्यापूर्वी, तर मनीषा ही चार महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आली होती.
मशीन चार्जिंगच्या नावाखाली पळ -- मनीषा शिवाजी सानप (४०, रा. अर्धमसला, ता. गेवराई) व चंद्रकांत पांडुरंग चंदनशिव (४५, रा. गेवराई) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, जालन्याचा डॉ. सतीश गवारे हा फरार झाला आहे. - २९ डिसेंबर २०२३ रोजी टोल फ्री क्रमांकावरून अज्ञात व्यक्तीने तक्रार केली होती. त्यावरून आरोग्य विभाग आणि पोलिसांनी कारवाईसाठी सापळा लावून गुरुवारी सकाळी गर्भवती महिला पोलिसाला तपासणीसाठी पाठविले. - तपासणी सुरू असतानाच पथकाने अंगणवाडी सेविका मनीषा सानप आणि घरमालक चंदनशिव यांना पकडले; परंतु, डॉ. गवारे हा सोनोग्राफी मशीन चार्जिंग करायची आहे, असे सांगून तेथून पळूनगेला.